आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला द्यायचा ही शिकवण आपल्याला मोठ्यांकडून कायम दिली जाते. म्हणूनच एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाल्ला जातो असंही आपल्याकडे म्हटले जाते. आपला खाऊ मित्रांना शेअर करायचा असेही आपण मुलांना कायम सांगतो. आता हे मित्र म्हणजे व्यक्तीच असतील असे काही नाही. तर आपल्या घरात आपल्यासोबत वाढणारे प्राणीही असू शकतात. घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर घरातली मुलं आणि हा प्राणी सोबतच वाढत असतात. एकत्र राहत असल्याने हे एकमेकांचे छान मित्रही होतात. मग एकमेकांसोबत खाणे, मस्ती करणे, आंघोळ करणे, फिरायला जाणे अशा सगळ्या गोष्टी या पाळीव प्राण्यासोबतच केल्या जातात.
नकळत आपल्याला या प्राण्याचा इतका लळा लागतो की त्याच्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही. एक तीळ सात जणांमध्ये वाटून खावा याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका लहान मुलाची आई या मुलाला गाडीत खाऊ भरवत असल्याचे दिसते. तर हा मुलगा आईने दिलेले थोडे खाऊन थोडे आपल्या मागे बसलेल्या कुत्र्याला भरवताना दिसतो. हा कुत्रा इतका शांतपणे छान मुलाकडून भरवून घेत आहे त्यावरुन त्यांची चांगली दोस्ती असल्याचे दिसते. या मुलाची निरागसता पाहून आपल्यालाही त्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.
हा व्हिडिओ टीकटॉकवर पोस्ट करण्यात आला असून नंतर तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या लहान मुलाची आई कारमध्ये एकदम पुढच्या सीटवर बसली आहे. ती पुढे पाहतच आपल्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलाला काहीतरी भरवत आहे. हा मुलगा त्या घासातील एक घास खातो आणि बाकीचे आपल्या मागे असलेल्या आपल्या कुत्र्याला देतो. आपला मुलगा आपण भरवत असलेले कुत्र्याला देत आहे हे कदाचित त्या आईला माहित नसल्याने तोच सगळे पटापटा खात आहे की काय असे या आईला वाटू शकते. हा व्हिडिओ काही दिवसांतच खूप जास्त व्हायरल झाला असून त्याला जवळपास १५ लाख लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर छान छान कमेंटस केल्या असून या दोघांतील मैत्रीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.