भावा-बहिणीचे नाते हे जन्मभरासाठी एकमेकांना साथ देणारे, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि अडीअडचणीला धावून जाणारे असते हे आपण सगळेच अनुभवतो. पण नाते कितीही जवळचे असले तरी व्यवहार तो व्यवहार असे म्हणत हिशोबाच्या बाबतीत चोख असणारे लोकही आपल्या आजुबाजूला असतात. इतर अडचणींबरोबरच काही वेळा आपल्याला अर्थिक अडचणीचाही सामना करावा लागतो. अशावेळी आपण सगळ्यात आधी आपले नातेवाईक किंवा जवळचे मित्रमैत्रीण यांच्याकडे धाव घेतो (Viral Photo). त्यांनी आपल्याला वेळोवेळी केलेली मदत आपण लक्षात ठेवतो आणि त्याची परतफेडही करतो. मात्र काही जण एकदा घेतलेले पैसे परत करत नाहीत. अशावेळी रक्कम मोठी असेल तर आपण काहीतरी तारण घेतो किंवा सरळ त्याचा स्टँप पेपर करतो (Sister Asked Brother For 2000 Rupees On Loan He made Stamp Paper ).
असेच एका बहिणीने आपल्य़ा भावाकडून २ हजार रुपये रक्कम उधार घेतल्यावर त्या भावाने त्याचा चक्क स्टँप पेपर तयार केला. सोशल मीडियावर या स्टँपपेपरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका पेपरवर स्टँप पेपर असे लिहून या भावाने २ हजार रुपये कर्ज म्हणून दिले आहेत आणि अमुक तारखेपर्यंत ती हे पैसे परत देणार आहे असे लिहीले आहे. इतकेच नाही तर यावर दोघांची सही आणि अंगठेही घेण्यात आले आहेत. “मिस आइमानेने मिस्टर कासिमकडून १८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता हे पैसे घेतले असून १५ ऑगस्टपर्यंत ती हे पैसे परत करणार आहे. असे यामध्ये म्हटले आहे.”
इतकी लहान रक्कम असून आणि बहिणीलाच दिलेली असून त्याने असे का केले असा प्रश्नही यातून निर्माण होतो. म्हणूनच या दोघांनी खरंच असा स्टँप पेपर केला आहे की फक्त गंमत म्हणून हे लिहीले आणि व्हायरल केले हे मात्र सांगता येत नाही. तसेच हे बहिण भाऊ नेमके कुठे राहणारे आहेत याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र बहिणीला पैसे दिल्यावर अशाप्रकारे स्टँप पेपर तयार करणे हे थोडे अजबच आहे. सोशल मीडियावर लोक या फोटोंवर बऱ्याच प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.