सर्वांना चेंज हवा आहे. बदल असला की मजा येते. मग ते काम असो की खाणं पिणं. आज जगात सर्वात जास्त प्रयोग होत असतील तर ते खाण्या पिण्याच्या बाबतीत होतात. आवड, आरोग्य, नाविन्य ,संस्कृती यांचा मेळ साधत किंवा कधी कधी याच्या एकदम विरुध्द असणारे प्रयोग होतात. खाण्याच्या प्रयोगांना लोकांची दादही खूप मिळते. खाऊन झाल्यावर लोक भलेही त्यावर टीका करतील पण काय आवडलं, काय नाही, काय असायला हवं यास्वरुपाच्या किमान प्रतिक्रिया देतात. प्रयोग करणार्याने प्रयोग करत राहावेत, चांगले प्रयोग करावेत असं उत्तेजनही देतात. पण सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून मात्र प्रयोगकर्त्यावर मात्र भयंकर टीका होते आहे. त्याने केलेला प्रयोग हा प्रयोग नसून पाप आहे अशा प्रकारे लोकांनी प्रतिक्रिया देऊन त्याला हे असं का केलं याचा जाब विचारला जातोय.
लॉकडाउनमधे घरोघरी गृहिणी किंवा नोकरदार स्त्रियांनाही खाण्याच्या पदार्थांमधे प्रयोग करायला वेळ मिळाला. केलेले प्रयोग घरात हिट झाल्यामुळे त्याचे फोटो, रेसिपी त्याबद्दल घरच्यांकडून मिळणार्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या गेल्यात. हे फक्त आपल्याच बाबतीत, विशिष्टच घरात झालं नाही तर देशभरात नव्हे जगभरात झालं. पदार्थांवर वेगवेगळे प्रयोग केवळ घरातच केले गेलेत असं नाही तर कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे बसलेल्या व्यवसायाल गती मिळण्यासाठी रस्त्यावर गाडा लावून खाद्यपदार्थ विकणार्यांनी, छोट्या मोठ्या रेस्टॉरण्टपासून फाइव्ह स्टार हॉटेलपर्यंत खाद्यपदार्थ, पेयं यावर प्रयोग केलेत. या सर्व प्रयोगांची चव लोकांनी चाखून पाहिली नसली तरी सोशल मीडियाद्वारे या प्रयोगांना दाद, प्रतिक्रिया देण्यात लोकांनी कंजुषी केली नाही. कौतुक असेल तर कंजुषी करु नये असं म्हणतात पण एका पदार्थ प्रयोगाबाबत लोकं करत असलेली टीका पाहाता जाऊ द्या, प्रयोग होता, थोडी टीकेत कंजुषी करा असं म्हणायची वेळ आली आहे.
Image: Google
टीका आवरा असं म्हणण्याची वेळ यावी असं झालं तरी काय? असा कोणता पदार्थ प्रयोग झाला म्हणायचा? तर या पदार्थ प्रयोगाचं नाव आहे जिलबी चाट. समोसा चाट, पाणीपुरी चाट तसा हा जिलबी चाट म्हणायचा का? पण कसं म्हणणार? फाफड्यासोबत जिलबी किती प्रसिध्द आहे हे जेठालाल नामक एका पात्रानं लोकप्रिय मालिकेतून सांगितलेलंच आहे. गरमागरम जिलबी कोणाला नुसती खायला आवडते. तर कोणाला थोडी गार किंवा शिळी झालेली जिलबी खायला आवडते. तर कोणाला दुधासोबत जिलबी खाणं हे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी पर्याय वाटतो. जिलेबी खाण्याच्या आपल्या भारतातील तरी हे चार पाच प्रकार आहेत. पण जिलेबी चाट हा कोणता प्रकार?
Image: Google
तर सोशल मीडियावर या जिलबी चाटचा फोटो, रेसिपी, ती कशी केली असं एकानं सांगितलं. शुक्रवार होता म्हणजे पुढे शनिवार रविवार हे वीकेण्डचे दिवस. म्हणून एकानं या आनंदाच्या भरात सगळ्या नेटिझन्ससाठी जिलबी चाटची पेशकश केली. त्यानं ट्विटरवर या पदाथार्चा फोटो पोस्ट केल्यावर हा फोटो काही मिनिटात व्हायरल झाला आणि 15 मिनिटाच्या आत या पोस्टवर टीकेच्या प्रतिक्रियांचा पूर आला.मुंबईत राहाणारे, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममधे काम करणारे मयूर सेजपाल यांनी हा जिलबी चाटचा प्रयोग केला. मयूर सेजपाल यांनी जिलबी चाट करताना तीन गर्म गरम जिलबी घेतल्या. त्या एका डिशमधे ठेवल्या. त्यावर दही, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव घातली. पण अनेकांन मयुर सेजपाल यांचं हे कॉम्बिनेशनच पटलं नाही. त्यामुळेच त्यावर टीकेच्या प्रतिक्रिया यायला लागल्या.
Image: Google
चटपटीत चाटवर तिखट प्रतिक्रिया
जिलबी चाट हा पदार्थ मोठ्या कौतुकानं करुन त्याचा फोटो टिवटरवर पोस्ट करणार्या मयूर सेजपाल यांना प्रतिक्रिया मात्र खूपच तिखट आल्यात. या प्रतिक्रिया वाचून पाहाच. 1. जिलबी चाट हा पदार्थ केवळ पाहूनही न रुचलेल्या एकानं ‘हे पाप करण्याआधी थोडा विचार करायला हवा होता.2. या पापासाठी नक्कीच गरुड पुराणात एक वेगळी शिक्षा नेमलेली असेल.3. मला वाटतं या महाशयांना गरुड पुराणात शिक्षेचा चॅप्टर अपग्रेड करायचा आहे वाटतं,4. जिलबीवर कोणी शेव घालून खातं का?5. जिलबीवर बारीक चिरलेला कांदा? अशक्य!6.अरे कोणी याचे हात बांधून ठेवा रे!7. एकानं जिलबी चाटचा सूड म्हणून आपणही पाण्याचे बॉल्स गुलाबजाम घालून देणार. त्याला भैय्या पापडी म्हणणार.. आणि पाणी म्हणजे जलजीरा असणार.8. वर्षाच्या शेवटी शेवटी का केलंत असं?9. तर कोणी हा फोटो पाहून मीच काय पाप केलं देवा म्हणत स्वत:ला कोसलं.10. तुम्ही हा पदार्थ खाल्ला की फक्त फोटोच टाकला?
अशा मनातला राग व्यक्त करणार्या पण वाचून मजा आणणार्या प्रतिक्रिया, विनोदी मीम्स जिलबी चाटवर आल्या आहेत. या प्रतिक्रियात एखाद्यानं मयूर सेजपालची बाजू धरुन आधी त्यांनी पोस्ट केलेला पावभाजीचा फोटोपण आठवा अशी आठवण करुन त्यांच्या प्रयोगाची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. स्वत: मयूर सेजपाल यांना या प्रतिक्रिया वाचून ढसाढसा रडण्याचा फोटो टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही.