'जॉनी जॉनी येस पापा, इटींग शुगर नो पापा..'हे गाणं लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आणि म्हटलेलं असतं. अतिशय सोपी शब्दरचना आणि छानसा ह्यूमर असलेलं हे इंग्रजीतील बडबडगीत लहान मुलांनाही आवडतं. हातवारे किंवा हावभाव करुन लहान मुलं हे गाणं अगदी छान पद्धतीने आपल्यासमोर सादर करताना दिसतात. आता हे गाणं इंग्रजीमध्ये असल्याने आपण ते दुसऱ्या कोणत्या भाषेत फारसे इमॅनिन करत नाही किंवा त्याचा अनुवादही करायला जात नाही. भले आपण आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेतो. मात्र ट्विंकल, ट्विंकल किंवा बाबा ब्लॅक शीप यांसारखी गाणी आपण त्यांना इंग्रजीमध्येच शिकवतो. प्रसंगी त्यांना समजेल अशा भाषेत आपण ते गाणे अनुवादीत करुन सांगतो, मात्र गाण्याची भाषा बदलत नाही (Johny Johny Yes Papa Different Language Version Student Learning from Teacher).
पण एका शिक्षिकेने आपल्या वर्गातील मुलांना हे जॉनी जॉनी गाणं शिकवताना चक्क ते अनुवादीत करुन शिकवलं. आता तिने हे गाणं कोणत्या भाषेत अनुवादीत केलं असा प्रश्नही आपल्याला पडला असेल. तर या शिक्षिकेनं हे गाणं चक्क मैथिली भाषेत अनुवादीत केलं आहे. शाळेच्या वर्गात एक मुलगा बसलेला दिसत असून ती त्याला ते गाणं शिकवत असताना व्हिडिओमध्ये दिसते. मागून इतर मुलांचेही आवाज ऐकू येतात. व्हिडिओच्या सुरुवातीला वेगळ्या भाषेतील हे गाणे गाऊन झाल्यावर नंतर ही शिक्षिका आणि मुले हे गाणं इंग्रजीमध्येही म्हणतात. इन्स्टाग्रामवर एज्युकेटर्स ऑफ बिहार (Educators of Bihar) या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
Hindi version of “johny johny yes papa” pic.twitter.com/lH2drJWQ9h
— Educators of Bihar (@BiharTeacherCan) September 25, 2022
मैथिली भाषेत कविता शिकवत असल्याने मुलांना याचा अर्थ समजणे सोपे जात असावे. अवघ्या २२ सेकंदांचा हा व्हि़डिओ आतापर्यंत १ लाखहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या शिक्षिकेचे आणि तिच्या शिकवण्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी अशाप्रकारे शिक्षण द्यायला हवे असेही म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या राज्यातील आणि कोणत्या शाळेतील किंवा क्लासमधील आहे हे मात्र समजू शकले नाही. पण सोशल मीडियामुळे सध्या जग खूप जवळ आले असल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी कोणतीही गोष्ट सहज आपल्यापर्यंत पोहोचते.