एखादा केक इतका सुंदर असतो की त्यावरी डिझाईन पाहून आपल्याला तो कापायची आणि खायचीही इच्छा होत नाही. त्यावरील कोरीव नक्षीकाम इतक्या सुबकतेने केलेले असते की करणाऱ्याच्या हातची कलाच म्हणावी लागेल. पूर्वी केक म्हणजे केवळ वाढदिवसाला आणली जाणारी गोष्ट होती. पण आता साखरपुडा, लग्न अगदी छोट्यातला छोटा समारंभ यालाही केक आवर्जून आणला जातो. या केकवर समारंभाशी निगडित थीमनुसार काही सजावटही केलेली असते. अशा खास प्रसंगी केक कापणे आणि तो क्षण सेलिब्रेट करणे हे आता फॅड झाले आहे. यामध्ये एकावर एक मजले असलेले उंचच्या उंच वेगवेगळ्या फ्लेवरचे केकही पाहायला मिळतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे हे केक जितके सुंदर दिसतात तितकेच चवीलाही सुंदर असतात.
नुकत्याच एका लग्नाच्या पार्टीमध्ये एका कपलने आपल्या लग्नानिमित्त केक कापला. नवीन आयुष्यात पदार्पण करत असल्याचा क्षण त्यांनी अतिशय छान पद्धतीने सेलिब्रेट केला. केक कापल्यानंतर एक व्यक्ती या दोघांनाही डीशमध्ये केक देत असतानाच एका व्यक्तीने अचानक तिथे येत हा अतिशय सुंदर असा केक उद्धवस्त केला. नुसता उध्वस्त नाही तर या व्यक्तीने इतका छान केक पूर्णपणे वाया घालवण्याच्या बेतात असून तो नवरीच्या आणि नवरदेवाच्या अंगावर टाकताना दिसतो. हे पाहून नवरी आणि नवरदेव दोघंही त्याच्यापासून लांब जातात. लग्नाचा केक खराब झालेला पाहून नवरी आणि नवरदेवाचा सगळा उत्साहच नाहीसा झाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर नवऱ्याने आपल्या मित्राला काय प्रतिक्रिया दिली असेल हे मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही.
या दोघांनाही काही कळायच्या आत काही सेकंदात हे कृत्य झाल्याने या दोघांच्या चेहऱ्यावर काहीसा राग व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसला. हे दोघेही या कृत्यामुळे चिडल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावर प्रचंड प्रमाणात कमेंटसही आल्या. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ ४२ लाख लोकांनी पाहिला असून ३.५ लाखांहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरीने पांढरा गाऊन तर नवरदेवाने गडद राखाडी रंगाचा ब्लेझर घातला आहे. तो नवरीच्या चेहऱ्यावर केक लावण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो नवरदेवाकडेही जातो. अनेकांनी अशाप्रकारे अन्नाची नासाडी करणे चुकीचे आहे, अशा लोकांना लग्नाला बोलवायलाच नको, कोणी अशी नासाडी कशी करु शकते अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता केक उद्धवस्त करणारा हा व्यक्ती कोण आहे आणि ही घटना नेमकी कुठे घडली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.