लग्न झालं की काही दिवसांतच तरुणींना वजन वाढल्याची चिंता सतावते. मग मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून लग्न मानवलं असे टोमणेही ऐकावे लागतात. आपल्याबाबतच असं काही घडतं असं आपल्याला वाटत असतं. मात्र बॉलिवूड अभिनेत्रीही यांसारख्या गोष्टींपासून फारशा दूर नसतात. त्यांनाही आपल्यासारखेच प्रश्न भेडसावतात आणि मग त्याही त्यासाठी काही ना काही उपाय करतात. ९० च्या दशकात आपले सौंदर्य आणि अभिनय याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेली प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिनेही असाच काहीसा अनुभव घेतला. एका मुलाखतीत नुकतेच तिने यावर भाष्य केले (Kajol Reveals Gaining 8 Kgs After Two Months Of Her Wedding).
अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचे २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न झाले. काजोल बंगाली असून अजय देवगण पंजाबी कुटुंबातील असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. लग्नाच्या २३ वर्षानंतरही या दोघांमधले बॉंडीग आजही तितकेच छान असल्याचे दिसते. लवकरच काजोलचा ‘सलाम वेंकी’ चित्रपट येत असून सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तिने ‘बॉम्बे जर्नी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने लग्नानंतर दोन महिन्यातंच आपले वजन कसे तब्बल ८ किलोनी वाढलं होतं असं सांगितलं.
हे सांगताना काजोल म्हणाली, “रोज सकाळी आमच्या टेबलवर वेगवेगळे पराठे असायचे. कधी कोबी पराठा, कधी पनीर पराठा तर कधी आलू पराठा असायचा. इतकंच नाही तर यावर भरपूर बटरही लावलेले असायचे. तेव्हा डाएट कसं करायचं याबाबत मला अजिबातच माहित नव्हते आणि डाएटमधला डी भी पता नही था” असंही ती अगदी मोकळेपणानं म्हणाली. यावेळी तिने चित्रपट, आपला प्रवास, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अशा बऱ्याच विषयावर सिद्धार्थशी गप्पा मारल्या. काजोलचे खाण्यावर विशेष प्रेम आहे आणि बंगाली असल्याने तिला मासे, खेकडे या गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात असेही तिने सांगितले. मात्र चित्रपट क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिला आपले वजन नियंत्रणात ठेवणे आणि डाएटकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने कदाचित पुढे तिला डाएट करावे लागले असावे.