सध्या करिश्मा चित्रपटांमधून दिसत नाही, हे खरं आहे. पण तरीही तिची कोणत्या ना कोणत्या कारणावरून निश्चितच चर्चा होत असते. करिश्मा इन्स्टाग्रामवरही खूप जास्त ॲक्टीव्ह असते. सध्या दिवाळीचा हंगाम असून करिश्माचे फेस्टीव्ह लूक ड्रेसिंग तर सोशल मिडियावर खूप जास्त भाव खाऊन जात आहेत. मागे काही दिवसांपुर्वी करिश्माने कांचीपुरम साडी नेसली होती. पिवळा रंग आणि गुलाबी काठ असं कॉम्बिनेशन असणारी ती साडी करिश्मावर जबरदस्त खुलून दिसत होती. आता पुन्हा एकदा करिश्माने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये करिश्मा अतिशय स्टनिंग दिसत आहे.
दिवाळीच्या दिवसात आपल्याकडे काळे कपडे घेतले आणि घातलेही जात नाहीत, ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. पण दिवाळी व्यतिरिक्त एखाद्या पार्टीसाठी, लग्न समारंभातल्या एखाद्या कार्यक्रमासाठी, संक्रांतीसाठी आपण असा लूक निश्चितच करू शकतो. करिश्माचा लेहेंगा पुर्णपणे काळा असून त्यावर सोनेरी आणि चंदेरी रंगातील दोऱ्याने खूप छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे. मुळात काळा रंगाची जादूच अशी आहे की तो कोणत्याही रंगासोबत चटकन मॅच होतो. त्यात करिश्माच्या लेहेंग्यावर वापरण्यात आलेले सोनेरी आणि चंदेरी रंगातले दोरे तिच्या लेहेंग्याला खूपच ग्लॅमरस लूक देणारे आहेत. या लेहेंग्याची ओढणी पण काळी असून तिच्यावरही सुरेख एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
करिश्माने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये करिश्मा एका शानदार खुर्चीवर बसली आहे. या लेहेंग्याच्या ब्लाऊजचा पुढचा गळा डीप व्ही शेप असून तिने गळ्यात कोणताही दागिना घातलेला नाही. एवढंच नाही तर करिश्माने कानातले, बांगड्या, अंगठी अशी कोणतीही ॲक्सेसरीज घातलेली नाही. तिने टिकलीदेखील लावलेली नाही, तरी करिश्माचा हा लूक अतिशय आकर्षक दिसत आहे. मुळात असे म्हणता येईल की हा लेहेंगाच एवढा सुंदर आहे की तो घातल्यानंतर आणखी खुलून दिसायला इतर कोणत्याही दागिन्याची गरज नाही. केसांच्या बाबतीतही करिश्माने एक साधा, सैलसर बन घातला आहे आणि त्यावर पांढरी फुलं लावली आहेत. "Hustle and Heart. Can set you apart" अशी कॅप्शन करिश्माने या फोटोंसाठी दिली आहे.
तुम्हालाही काळ्या कपड्यांची खरेदी करायची आहे?
बऱ्याच पार्टीसाठी काळ्या कपड्यांची थीम ठेवली जाते. कारण काळ्या रंगाची जादूच काही वेगळी असते. काळे कपडे जर नीट कॅरी केले आणि काळे कपडे घातल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या, हे जर व्यवस्थित जाणून घेतले तर निश्चितच काळा रंग प्रत्येकाला खुलूनच दिसतो. काळ्या रंगाची जादूच अशी आहे की जेव्हा तुम्हाला ऑफिससाठी काही फॉर्मल ड्रेसिंग करायची असेल तेव्हाही आणि जेव्हा एखाद्या पार्टीला जायचं असेल, तेव्हाही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता. त्यामुळे always and any time हीट ठरणारे काळ्या रंगाचे कपडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत. गोऱ्या व्यक्तींना काळा रंग जेवढा छान दिसतो तेवढाच आकर्षक तो गव्हाळ आणि सावळ्या रंगाच्या मुलींनाही दिसतो. पण त्यासाठी काही गोष्टींची काळजी मात्र घ्यायलाच हवी.
काळ्या रंगाचे कपडे घालताना .....
- काळ्या रंगाचे कपडे घातल्यावर खूप जास्त करणे टाळावे. हलका आणि लाईट कलरचा मेकअप करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे तुमचा लूक अतिशय एलिगंट वाटतो.
- काळ्या रंगाचे कपडे असल्यास ब्राऊन किंवा पिंक रंगाची लिपस्टिक लावावी. काळ्या ड्रेसवर ब्राईट रेड लिपस्टिक तुमचा लूक गॉडी बनवते.
- काळ्या रंगासोबतच कोणत्याही ज्वेलरी तुम्ही घालू शकता. पण ज्वेलरीदेखील नाजूक असाव्यात. जास्त भडक आणि मोठे दागिने काळ्या रंगाचे कपडे घातल्यावर घालणे टाळा.
- एखाद्या नाईट पार्टीसाठी काळ्या रंगाचे कपडे घालून जात असाल तर शिमर मेकअप करा.