पतीला दिर्घायुष्य मिळावं यासाठी भारतातील बहुतांश सर्व भागात करवा चौथचं व्रत केलं जातं. दिवसभर उपवास करुन चंद्राची पूजा करुन महिला हे व्रत करतात. पण गाजियाबादमध्ये मात्र करवाचौथला पतीसाठी व्रत करण्याऐवजी पतीला धुण्याचा प्रसंग एका पत्नीवर आला. त्याचे कारणही तसेच होते. करवा चौथला जी पत्नी आपल्यासाठी व्रत करते तिच्यासाठी काही खरेदी करण्याऐवजी पती महाशय आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन बाजारात खरेदी करत होते. त्यावेळी पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले आणि दोघांनाही चांगला चोप दिला (Karva Chauth Viral Video Wife Beat Husband and Girlfriend in Ghaziabad Market).
विशेष म्हणजे पती जेव्हा बाजारात गर्लफ्रेंडसोबत खरेदी करत होता तेव्हाच पत्नीही तिच्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला पतीचे अफेअर असल्याचे समजले आणि भर बाजारात या दोघींनी मिळून पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारायला सुरूवात केली. काही वेळातच याठिकाणी पोलीस हजर झाले आणि त्यांनी पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ताब्यात घेतले. गर्लफ्रेंडला काही वेळात चौकशी करुन सोडून देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाझियाबादमध्ये कौशल नगर येथे राहणाऱ्या एका महिलेचे २०१७ मध्ये प्रताप विहारमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. मात्र घरगुती हिंसाचार होत असल्यामुळे ही पत्नी आपल्या मुलासोबत माहेरी राहत होती.
गुरुवारी ही पत्नी तुराबनगर मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत खरेदी करताना पाहिले आणि तिला राग अनावर झाल्याने तिने आई आणि बहिणींना सोबत घेत पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १ मिनीटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून नेटीझन्सनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.