बार्बी डॉल म्हणून ओळख असलेली कतरिना कोणाची होणार यावरुन मागील काही वर्षांपासून चर्चा होती मात्र आता अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. २०१९ पासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, त्यांच्या या नात्याला अखेर नाव मिळणार असून येत्या ९ डिसेंबरला खास शाही पद्धतीने राजस्थानमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ७ डिसेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. कतरिनाची मेहेंदी, लग्नातील कपडे यांबाबत मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. रविवारी कतरिना आणि तिचे कुटुंबिय विकी कौशलच्या घरी गेले होते. लग्नाआधी कतरिनाच्या कुटुंबियांसाठी विकीच्या घरी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करतिनाने पांढऱ्या रंगाची रफल साडी नेसली होती. तिची ही साडी पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे. अतिशय साधी वाटणारी पण तरीही स्टायलिश लूक देणाऱ्या या रफल साडीतील कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि कतरिनाच्या या फॅशनविषयी पुन्हा चर्चा रंगली. ही साडी थोडीथोडकी नसून तब्बल ५४ हजारांची आहे. पांढऱ्या रंगाच्या या साडीवर कतरिनाने स्लिव्हलेस टिकल्यांचे छान सिक्वीन ब्लाऊज घातले होते. जास्त दागिने न घालता तिने केवळ मोठे कानातले घालून आपला लूक खुलवल्याचे पाहायला मिळाले. आता कतरिनाने नेसलेली ही रफल साडी म्हणजे काय? हा प्रकार कुठून आला आणि एकूणच या फॅशनविषयी जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेत्रींबरोबरच तरुणींचीही पसंती
जाडजूड काठापदराच्या साड्यांऐवजी आता महिला हलक्याफुलक्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या नेसणे पसंत करतात. रफल साडी हा त्याला एक उत्तम पर्याय ठरु शकतो. सध्या रफल साडी हा साडीतील प्रकार बराच चर्चेत आहे. पूर्वीच्या काळी जोरदार चालणारी ही जुनी फॅशन आता पुन्हा इन आहे. आलिया भट, शिल्पा शेट्टी, मीरा राजपूत यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपले रफल साडी नेसलेले फोटो शेअर केले होते.
नेमका कसा असतो साडीचा प्रकार...
सिल्क किंवा एकदम पातळ अशा कापडातील रफल साडी म्हणजे ज्या साडीला खालच्या बाजुने आणि पदराच्या बाहेरच्या बाजुने फ्रिल दिलेल्या असतात अशी साडी. वाऱ्यावर उडणाऱ्या या प्लेटस किंवा फ्रिल अगदी वेगळ्या दिसत असल्याने सध्या अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान अशाप्रकारची रफल साडी नेसणे पसंत करतात. पदर पिन अप केला की पदराच्या आणि खाली असलेल्या या फ्रिल्स आपण चालतो किंवा हातवारे करतो त्याप्रमाणे उडतात, त्यामुळे ही साडी एकदम हटके दिसते.
फॅशनेबल लूकमध्ये तुम्हीही दिसाल हटके
या साडीला बऱ्याच फ्रील्स देण्यात आल्याने त्या साड्या साधारणपणे प्लेन असतात. प्लेन असल्याने त्यांच्या फ्रिल्स सहज उठून दिसतात. साडीच्या खालच्या बाजुने किती जास्त प्लेटस या फ्रिल हव्या आहेत, त्या सरळ हव्या की वेव्हजप्रमाणे याचे काही पर्याय उपलब्ध असतात. या साडीवर साधारणपणे स्लिव्हलेस ब्लाऊज चांगले दिसते. तसेच एखादा डिझायनर बेल्ट किंवा कंबरपट्टा घातल्यास या साडीचा लूक आणखी उठून येतो. पारंपरिक ज्वेलरीपेक्षा डिझायनर ज्वेलरी यावर जास्त खुलून दिसते. त्यामुळे तुमच्याकडेही एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही ही साडी आणि हा हटके लूक नक्की ट्राय करु शकता.