पावसाळा म्हटलं की घरात वेगवेगळ्या मार्गांनी जंतूंचा शिरकाव होतो. पावसाळ्यात आरोग्य जपण्यासाठी घर स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक असतं. घर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ पाण्यानं फरशी पुसून चालत नाही. प्रभावी जंतूनाशकांचा वापर करावा लागतो. इफेक्टिव्ह जंतूनाश्कं कोणती हे दुकानातून शोधून शोधून आणावी लागतात पण ती घरातील जंतूंचा नायनाट करण्यासाठी ती खरंच इफेक्टिव्ह ठरतील का? ही शंका असतेच. ही शंका मनातून घालवण्यासाठी आणि घरातून जंतूंचा नायनाट करण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे घरच्याघरी जंतूनाशक स्प्रे तयार करावेत. घर जंतूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी घरच्याघरी जंतूनाशक स्प्रे तयार करता येतात. लिंबू, कडूनिंबं आणि लसूण यांचा वापर करुन 3 प्रकारचे जंतूनाशक स्प्रे घरच्याघरी तयार करता येतात.
Image: Google
लेमन स्पे
लेमन स्प्रे तयार करण्यासाठी अर्धा कप लिंबाचा रस, 2 चमचे बेकिंग सोडा, अर्धा लिटर पाणी, लवेण्डर ऑइलचे 2 थेंब आणि एक स्प्रे बाॅटल घ्यावी. लेमन स्प्रे तयार करताना सर्वात आधी पाण्यात लिंबाचा रस घालून तो पाण्यात एकजीव करुन घ्यावा. नंतर यात बेकिंग सोडा घालून पाणी हलवून घ्यावं. थोडा वेळ पाणी सेट होण्यासाठी तसंच ठेवावं. 5-10 मिनिटानंतर हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरुन ठेवावं. या स्प्रेला सुवास येण्यासाठी द्रावण बाटलीत भरल्यानंतर यात लव्हेंडर ऑइलचे थेंब घालावेत.
Image: Google
नीम स्प्रे
नीम ऑइल जंतूनाशक स्प्रे तयार करण्यासाठी 2 चमचे नीम ऑइल, अर्धा लिटर पाणी, अर्धा चमचा व्हिनेगर आणि एक स्प्रे बाॅटल घ्यावी. नीम ऑइल स्प्रे तयार करण्यासाठी सर्वात आधी मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन घ्यावं. गरम पाण्यात व्हिनेगर घालावं. पाणी हलवून सेट होवू द्यावं. पाणी गार झाल्यावर ते स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. नंतर यात कडुनिंबाचं तेल घालावं. तेल घातल्यानंतर ते सेट होण्यासाठी बाॅटल तशीच ठेवावी. 20 मिनिटांनी कडुनिंबाचं तेल पाण्यात मिसळलं जातं. मग हा नीम स्प्रे वापरण्यासाठी तयार होतो.
Image: Google
गार्लिक स्प्रे
स्वयंपाकाला स्वाद आणणारा लसूण प्रभावी जंतूनाशकही आहे. लसणाचा वापर करुन गार्लिक जंतूनाशक स्प्रे तयार करता येतो. या स्प्रे तयार करण्यासाठी 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा लिटर पाणी, 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 स्प्रे बाॅटल घ्यावी. गार्लिक स्प्रे तयार करण्यासाठी लसूण निवडून लसणाची पेस्ट तयार करुन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवावं. पाण्यात लसणाची पेस्ट घालून पाणी चांगलं उकळून घ्यावं. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करावा. नंतर 3-4 तास हे पाणी असंच राहू द्यावं. नंतर हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. पाणी बटलीत भरल्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालावा. बाटलीला झाकण लावून पाणी चांगलं हलवून घ्यावं.