डॉक्टर, सगळं शहर फिरलो पण हे औषध कुठंच मिळत नाही. काहीजण म्हणाले दुसऱ्या कंपनीचं घेता का? काहीजण म्हणाले उद्या मागावून देतो पण आत्ता मिळत नाही? असं म्हणून एक पेशंट डॉक्टरसमोर प्रिस्क्रीप्शन ठेवतो. डॉक्टर ते पाहतात आणि म्हणतात हे औषध नाही. पेन चालतंय की नाही पाहत होतो? - असे विनोद डॉक्टरांच्या हस्ताक्षराविषयी कायम केले जातात. डॉक्टरांचं हस्ताक्षर चांगलं नसतं असेही आरोप होतात. मात्र सध्या एका डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन व्हायरल होतं आहे. आणि ते प्रिस्क्रिप्शन इतक्या सुवाच्च्य आणि देखण्या हस्ताक्षरात लिहिलेलं आहे की ते सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं. अनेकांनी मान्य केलं की डॉक्टरांचं हस्ताक्षरही उत्तम असतं आणि उगाच त्यांच्यावर काहीबाही जोक करणं योग्य नाही. अर्थात काही टवाळ म्हणालेच की बघा, नियम अपवादानेच सिध्द होतो.
(Image : google)
केरलमधळ्या डॉ. नितीन नारायणन असं या डॉक्टरांचं नाव असल्याची चर्चा आहे. पल्लकडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे डॉक्टर आहेत. मातृभूमी नावाच्या वृत्तपत्राने ही बातमी प्रसिध्द केली असून गेली ३ वर्षे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रॅक्टीस करणाऱ्या या डॉक्टरांना लहानपणपासूनच सुंदर हस्ताक्षराची ओढ आणि सराव असल्याचे कळते. एशियानेटला दिलेल्या मुलाखतीत ते डॉक्टर सांगतात की, मला आवडतं सुंदर देखणं अक्षर काढायला. बाकी डॉक्टर घाईत असतील म्हणून अक्षर बरं येत नसेल. मी लिहितो सुवाच्य.
(Image : Google)
बेन्सी डी या युजरने सर्वप्रथम ते फेसबूकवर शेअर केल्याचं कळतं. सोशल मीडियात अनेकांनी डॉक्टरांचं हे प्रिस्क्रीप्शन शेअर केलं अगदी, आनंद महिंद्रा यांनीही...
उत्तम अक्षर हाच सुंदर दागिना असं लहानपणी शाळेत शिकवत, डॉक्टरांचं हे व्हायरल प्रिस्क्रिप्शन नव्या काळातही तीच गोष्ट सांगतं आहे.