आपण रोजच्या रोज किचनमध्ये स्वयंपाक करतो. मात्र रोजच्या धावपळीत आपल्याला गॅस शेगडी किंवा मिक्सर साफ करायला वेळ होतोच असे नाही. रोजच्या रोज या गोष्टी आपण वापरत असल्याने कधी त्यावर तेल सांडते तर कधी अन्नाचे कण, दूध असे काही ना काही सांडून ते खराब होतात. हे डाग चिकट असल्याने नुसत्या फडक्याने पुसून ते निघत नाहीत. नियमितपणे हे साफ करणे जमले नाही तर त्यावर एकप्रकारचा मेंचट थर जमा होतो. काही दिवसांनी शेगडी किंवा मिक्सर इतके खराब दिसायला लागतात की ते साफ करणे हे एक मोठे काम होऊन बसते (Kitchen Cleaning Hacks).
आता हे दोन्ही साफ करायचे असेल आणि त्यावर जमा झालेला थर झटपट काढायचा असेल तर त्यासाठी आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा उपाय होत असल्याने त्यासाठी फारसा खर्चही होणार नाही. विशेष म्हणजे यामुळे हे दोन्ही इतके छान स्वच्छ होईल की अगदी नवीन आणल्यासारखे वाटेल. १५ दिवसांतून किंवा महिन्याने हा उपाय केल्यास घर स्वच्छ तर होईलच पण किचनमध्ये झुरळं, मुंग्याही होणार नाहीत. यामुळे आरोग्य चांगले राहण्यासही नक्कीच मदत होईल.
१. खराब झालेल्या मिक्सरवर सगळीकडून मीठ घाला आणि त्यावर लिंबाचा रस पिळा. या दोन्हीचे रासायनिक मिश्रण होऊन त्यावर जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होईल.
२. यानंतर २ लिंबाचे सालासहीत बारीक काप करा आणि त्यात पाणी घालून मिक्सर करा. याची बारीक पेस्ट तयार होईल.
३. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा बेकींग सोडा घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा.
४. आता खराब झालेला टूथब्रश यामध्ये बुडवून त्याने मिक्सर सगळ्या बाजुने घासा. नंतर ओल्या फडक्याने मिक्सर पुसून घ्या. काही मिनीटांत मिक्सर नव्यासारखा चकचकीत दिसायला लागेल.
५. घरातली एखादी घासणी किंवा गॉज घेऊन तो या मिश्रणात बुडवा आणि त्याने गॅसची खराब झालेली शेगडी घासा.
६. साबणाने निघणार नाही इतक्या झटपट शेगडी या मिश्रणाने स्वच्छ होईल. त्यानंतर ओल्या फडक्याने शेगडी पुसून घेतली तर ती चकचकीत दिसायला लागेल.