Join us  

दिवाळीसाठी किचनची साफसफाई करणार असाल तर ५ सोप्या टिप्स; तासाभरात किचन होईल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 3:21 PM

Kitchen Cleaning Tips For Diwali : किचनची साफसफाई ही सर्वात महत्त्वाची असते, ती झटपट आणि छान होण्यासाठी काही सोप्या टिप्स...

ठळक मुद्देकिचन साफ करण्याचा ताण न घेता योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  साफसफाईच्या बाबतीत काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर काम सोपे होते.

दिवाळी म्हटली की घराची साफसफाई आलीच. एरवी आपण घर साफ करतच असतो. पण दिवाळीच्या निमित्ताने आपण घराचे डीप क्लिनींग करतो. यामध्ये सगळ्यात जास्त काम असते ते किचनमध्ये, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे किचन ही सर्वाधिक वेळ वापरली जाणारी खोली आहे. स्वयंपाक करण्यासाठी, जेवणासाठी, खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवण्यासाठी घरातील महिला वर्गाचा या खोलीत सर्वात जास्त वावर असतो. त्यामुळेच किचन बरेचदा इतर खोल्यांपेक्षा जास्त खराब असते. आता दिवाळीच्या निमित्ताने किचन आवरायला काढायची म्हणजे एक दिव्य काम असते. कारण एरवी घाई गडबडीत किचन बरीच खराब झालेली असते. टाईल्सवर पडलेले डाग, डब्यांवर साचलेली घाण, डाग पडलेले शेल्फ, रोजच्या वापराने खराब झालेले ओटा आणि सिंक, किचन ट्रॉलिजमध्ये साठलेला कचरा, माक्रोव्हेव, मिक्सर, गॅस शेगडी अशा सगळ्याच वस्तूंवर राप चढलेला असतो. या सगळ्या गोष्टी झटपट साफ करायच्या असतील तर काही सोप्या टिप्स लक्षात घ्या (Kitchen Cleaning Tips For Diwali)...

१. स्वयंपाकघरात पदार्थांना फोडणी देताना, कुकरच्या शिट्टीतून आणि इतरही अनेक कारणांनी किचन ओट्याच्या मागील टाइल्स खराब होतात. एकदा त्या खराब व्हायला लागल्या की वेळच्या वेळी साफ केल्या नाहीत तर हा थर साठत जातो. या टाईल्स साफ करण्यासाठी बेकींग सोडा, व्हिनेगर, स्टेन क्लिनर, हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा अगदी साबणाच्या पाण्याचाही चांगला उपयोग होतो. 

२. सिंक ही किचनमधील खराब होणारी आणखी एक गोष्ट. सिंक साफ करण्यासाठी काही सोप्या ट्रीक्स माहित असणे आवश्यक असते. कडुलिंबाचे तेल, बेकिंग सोडा व्यतिरिक्त व्हिनेगरचाही वापर करु शकता. व्हाईट व्हिनेगर वापरल्याने डासांच्या अळ्या तसेच किटक असल्यास ते नष्ट होण्यास उपयोग होतो.

३. ट्रॉली किंवा मांडणीला काही वेळा पाण्यामुळे गंज लागण्याची शक्यता असते. अशावेळी मांडणीवरील गंज काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी गरम पाण्यात २ चमचे अमोनिया घालून मिश्रण तयार करून घ्या हे मिश्रण तयार केल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रॅकच्या चारही बाजूंना शिंपडा. २० मिनिटांनी ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीनं रगडून मांडणी स्वच्छ करा. त्यानंतर कोरड्या कपड्याने रॅक पुसून घ्या. 

४. स्वयंपाकघरातील काउंटर, खिडकी, गॅस इत्यादींवर तेलाचे डाग असल्यास गरम पाण्याचा वापर करू शकता. यामुळे किचनचा ओटा उजळेल आणि त्याचबरोबर किचन काउंटरमध्ये साचलेली घाण, दुर्गंधी दूर होईल. 

५. गॅस शेगडी, मिक्सर, फ्रिज, ओव्हन यांसारख्या गोष्टी आपण किचनमध्ये नियमितपणे वापरत असतो. पण हे सगळे एकदम साफ न करता एक एक करुन साफ करा. योग्य ते नियोजन केले आणि चांगल्या उपकरणांचा वापर केला तर हे सगळे अगदी १० ते १५ मिनीटांत साफ होते. त्यामुळे किचन साफ करण्याचा ताण न घेता योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स