सकाळच्या घाईत स्वयंपाक करताना किंवा कुणी पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी काही करायचे असले की आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट सापडता सापडत नाही (Kitchen Hacks). आपणच डाव्या-उजव्या हातानी वेळेला सापडावे म्हणून अगदी हाताशी येईल असे ठेवलेले असते. पण वेळेला मात्र सगळे डबे उघडून झाल्यावर बरोबर शेवटच्या डब्यात ती गोष्ट सापडते. अशावेळी आपली होणारी चिडचिड नेहमीचीच. वेळेला आपल्याला सगळे नीट सापडावे त्यासाठी आपण अनेकदा सगळे व्यवस्थित लावून ठेवतो. कितीही व्यवस्थित लावले तरी काही दिवसांत परत तीच अवस्था होते आणि ऐनवेळेला आपली धांदल उडते ती उडतेच. पण असे होऊ नये म्हणून किराणा सामान लावताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो (Kitchen Tips). पाहूयात या गोष्टी कोणत्या...
१. किराणा सामान भरताना एकसारख्या आकाराचे ४ ते ५ च डबे असावेत. जेणेकरुन ठराविक प्रकारचे सामान त्या डब्यांमध्ये आहे हे आपल्या डोक्यात नक्की असेल. म्हणजेच डाळींसाठी वेगळ्या प्रकारचे डबे, कडधान्यांसाठी वेगळ्या प्रकारचे डबे, वेगवेगळ्या पीठांसाठी वेगळ्या प्रकारचे किंवा आकाराचे डबे करावेत. याशिवाय दाणे, साखर, गूळ, मीठ यांसारख्या गोष्टींसाठी वेगळ्या प्रकारच्या बरण्या किंवा डबे असावेत.
२. सध्या बाजारात काचेचे, प्लास्टीकचे किंवा अगदी स्टीलचेही अतिशय वेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे डबे, बरण्या मिळतात. काच किंवा प्लास्टीक असेल तर आपल्याला आतला पदार्थ पटकन दिसतो आणि घाईच्या वेळी शोधण्यात वेळ जात नाही. तसे न करता तुम्ही पारंपरिक स्टीलचे किंवा इंडालियमचे डबे वापरत असाल तर त्यावर लावण्यासाठी आकर्षक स्टीकर मिळतात त्यांचा वापर करा.
३. बिस्कीटे, खारी, टोस्ट, वाटी केक यांसारख्या चहासोबत खाण्याच्या पदर्थांचा एक वेगळा डबा करा. याबरोबरच आपल्याकडे फरसाण, चिवडा, वेफर्स असा कोरडा खाऊही असतो या खाऊसाठी वेगळा डबा करा. राजगिरा चिक्की, खजूर, दाण्याची चिक्की अशा पौष्टीक खाऊसाठी एक छानसा डबा करु शकता.
४. सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ, तसेच तीळ, ओवा, यांसारख्या पदार्थांसाठी बाजारात छान छान आकर्षक बरण्या मिळतात. काचेच्या बरण्यांमध्ये हे पदार्थ चांगले राहतात. बाजारात एक फएरफटका मारला तर तुमच्या घरातील जागेनुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला या बरण्या खरेदी करता येऊ शकतात. त्या दिसायलाही सुंदर दिसत असल्याने दर्शनी भागात ठेवणार असाल तर त्यादृष्टीने विचार करा.
५. बरेचदा आपण सामान डब्यांमध्ये किंवा बरण्यांमध्ये काढून ठेवतो. पण तरीही पिशवीत जास्तीचे सामान उरतेच. अशावेळी या पिशव्या इकडे-तिकडे लोळत राहतात. कधी ट्रॉलीच्या एखाद्या कप्प्यात तर कधी ओट्यावरच्या कोपऱ्यात त्यांना जागा दिली जाते. त्यामुळे पसारा दिसू शकतो. अशावेळी असे जास्तीचे राहिलेले सामान ठेवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा डबा किंवा कोठी करु शकता. घराच्या गॅलरीमध्ये किंवा एखाद्या न लागणाऱ्या कपाटात ही कोठी किंवा डबा अगदी सहज बसू शकतो. पुढच्यावेळी सामान भरताना हा डबा किंवा कोठी पाहिल्यास तुम्हाला नेमके काय सामान नव्याने भरायचे आहे याचा अंदाजही येऊ शकतो.