फ्रिज चांगला टिकवायचा असेल तर तो चांगल्या पद्धतीने हाताळायला हवा आणि स्वच्छ ठेवायला हवा. अलीकडे फ्रिज स्वच्छ राहावा, भाज्या ऑर्गनाईज राहाव्या, ट्रे स्वच्छ राहावे, फ्रिज कंपार्टमेंटच्या काचा पारदर्शक राहाव्यात यासाठी वेगवेगळे उपयुक्त प्रोडक्ट बाजारात आले आहेत. मात्र इथे आपण चर्चा करणार आहोत ती फ्रिजचे दार स्वच्छ ठेवण्याची आणि त्यासाठी घरगुती टिप्सदेखील जाणून घेणार आहोत.
बऱ्याचदा घाईगडबडीत फ्रिजमधून वस्तू घेतो आणि दार लोटून टाकतो आणि ते नीट बंद झाले की नाही बघायला विसरतो. त्यामुळे फ्रिजमध्ये बिघाड होतो. फ्रिजच्या दारावर मातीचे थर बसतात आणि रबरावर चिकटपणा येतो. त्यामुळे दार आधीसारखे आपणहून लगेच बंद होत नाही. ते ढकलावे लागते किंवा दाबून बंद करावे लागते. यासाठी दारावरचा दुर्लक्षित थर दूर करण्याचा घरगुती उपाय जाणून घ्या.
साहित्य : १ पेला कोमट पाणी, १ चमचा टूथपेस्ट, २ चमचे डिश वॉश सोप, १ चमचा बेकिंग सोडा.
कृती : लक्षात ठेवा, की या उपायासाठी आपल्याला उकळते पाणी नाही तर कोमट पाणी लागणार आहे. जेणेकरून चिकटपणा पुसण्यास मदत होईल. अति गरम पाण्याने रबर खराब होऊ शकते. यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा.
>> कोमट पाण्यात टूथपेस्ट, बेकिंग सोडा आणि डिश सोप टाकून ते मिश्रण एकत्र करा.
>> ते मिश्रण एकजीव झाले की एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.
>> स्प्रे बॉटलने रबरी भागावर आणि फ्रिज दारावर स्प्रे करून घ्या आणि १ मिनिट ते तसेच राहू द्या.
>> एका स्पंजला दोन चार आडव्या चिरा मारून त्या स्पंजने रबरी भाग आणि दाराचा भाग स्वच्छ पुसून घ्या.
>> कमी कष्टात फ्रिजचे दार चकाचक करण्याचा हा सोपा उपाय जरूर ट्राय करून बघा.
>> स्वच्छ फ्रिज आणि दार बघून समाधान मिळेल हे नक्की!