सुट्टीचा एक दिवस घरात आवराआवर करण्यात जातो. घराची स्वच्छता, केर, जळमटं, भांड्यांचे रॅक सगळे काही आवरून शांत बसावे तर एका कोपऱ्यात डागाळलेला मिक्सर दिसतो. त्याच्यावर पडलेले चटणी, टोमॅटो प्युरी, वाटणाचे वाळलेले डाग पुसायचे म्हटल्यावर उबग येतो. दुर्लक्ष करावे, तर त्यावर मातीचे थर बसून मिक्सर आणखीनच कळकट्ट दिसू लागतो. यावर उपाय म्हणजे एक तर तो हातासरशी अर्थात काम झाल्यावर लगेच पुसून टाकावा किंवा आठवड्यातून, पंधरवड्यातून एकदाच पुसणार असाल तर पुढील सोपी ट्रिक वापरा.
मिक्सर हे यंत्र असल्यामुळे ते स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. इलेक्ट्रिक वस्तूंचा पाण्याशी संपर्क येता कामा नये अथवा शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते. त्यामुळे मिक्सर पुसतानाही आधी त्याच्या सगळ्या पोकळ्या चिकटपट्टीने झाकून घ्या. त्यानंतर पुढील दोन मिश्रणांपैकी एका मिश्रणाचा टूथपेस्टच्या साहाय्याने वापर करून मिक्सर क्लीन करून घ्या.
साहित्य आणि कृती :
- टूथपेस्ट, डिश वॉश आणि व्हिनेगर एकत्र करून घ्या.
- टूथब्रशच्या साहाय्याने सगळ्या खाचा खोचांमध्ये ते मिश्रण लावून घ्या.
- ब्रशने हलकेच घासून १-२ मिनिटे मिश्रणाचा थर मिक्सरवर राहू द्या.
- त्यानंतर कोरड्या रुमालाने मिक्सर पुसून घ्या.
- बारीक खाचा स्वच्छ करण्यासाठी कापसाच्या काडीचाही वापर करता येईल.
- सगळे डाग निघून गेल्याने मिक्सर नव्यासारखा दिसू लागेल.
दुसरी पद्धत :
- मिक्सरच्या काळवंडलेल्या भागावर आणि विशेषतः मिक्सरच्या भांडे फिरवतो त्या जागेत टूथपेस्ट लावून घ्या.
- त्या आवरणावर चमचाभर इनो आणि व्हिनेगर टाका.
- एकत्रित मिश्रणाचा फेस होईल, त्यातच टूथब्रशने सगळी जागा स्वच्छ करून घ्या.
- त्यानंतर कोरड्या रुमालाने ती जागा पुसून घ्या.
- याठिकाणी ओल्या पण पिळून घेतलेल्या कापडाचाही वापर करता येईल.
दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर केलात तरी मिक्सर पूर्ण कोरडा झाला की मगच पुनर्वापरात आणा. पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या!
तसेच एखाद्या भांड्याचे, तपेल्याचे, पातेल्याचे बूड करपले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कोळशाची पूड, कपडे धुण्याची पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या आणि घासणीने ते मिश्रण करपलेल्या भागावर लावून घासा, काही क्षणात भांड्याचा तळ स्वच्छ होईल.