सोशल मीडिया फेक असतो याचा अनुभव आपण सगळ्यांनी अनेकदा घेतलेला असतो. अनेकदा आपल्या मनात वेगळेच असते आणि आपण स्टेटसला वेगळीच गोष्ट अपडेट करत असतो. मनाने निराश आणि उदास असलेले आपण काही वेळा मित्रमंडळींसोबत आनंदाने वावरत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो. अशावेळी आपलं कोणतं रुप खरं असा प्रश्न आपलंच दुसरं मनही आपल्याला हळूच विचारतं. पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा आपण मागे पडू नये आणि आऊटडेटेड होऊ नये यासाठी आपला दिवसरात्र अट्टाहास सुरु असतो. आपल्या फोनमध्ये असणारे विविध प्रकारचे फिल्टरही आपल्यावर खूप दबाव आणतात आणि अवास्तव सौंदर्याच्या अपेक्षा ठेवतात (Know How Fake Social Media Is how one can use Filters Post of Women goes viral).
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली मिरांडा म्हणजेच ‘मिमी’ इंजेक्टर आणि नर्स आहे. ती लोकांना बोटॉक्स प्रक्रियेबद्दल माहिती देत असते. सोशल मीडिया फिल्टर्सच्या बनावटपणाचा पर्दाफाश करण्यासाठी मिमीने नुकताच एक व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये मिमीने फिल्टर्सचा वापर करुन तुम्ही कशाप्रकारे आपल्या सौंदर्यात भर घालू शकता हे दाखवले. हा व्हिडिओ काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याला ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तर ६ लाख ७० हजारहून जास्त लाईक्सही मिळाले. हा व्हिडिओ टिकटॉकवर असल्याने आपल्याकडे तो दिसू शकत नाही.
याच निमित्ताने आपण या विषयाचा थोडा विस्ताराने विचार करणार आहोत. जेव्हा आपण लोकांना ऑनलाइन दिसत असतो तेव्हा स्वच्छ नितळ त्वचा, परिपूर्ण शरीर असल्याचा भास आपण अनेकदा निर्माण करतो. परंतु आपल्याला हे समजत नाही की वास्तविक जीवनात असे कोणीही दिसत नाही. सोशल मीडिया किंवा फिल्टर्स हे आपणच आपल्याला आणि समोरच्यांना फसवण्याचे एक माध्यम आहे हे लक्षात ठेवा आणि त्यातून वेळीच जागे व्हा. नाहीतर या चक्रात अडकून पडायला फारसा वेळ लागणार नाही. एकदा या दुष्टचक्रात अडकलो आणि स्वत:ची सुंदर प्रतिमा दाखवण्याचा मोह पडला तर त्या मोहातून बाहेर येणे आणि खऱ्या स्वत:ला स्वीकारणे कदाचित अवघड होऊन जाईल. मोबाइलच्या फिल्टरमध्ये फोटो एडीट करुन ते पोस्ट करणं आणि लोकांची वाहवा मिळवणं फारसं अवघड नाही. पण प्रत्यक्षात आपण तसेच आहोत की आपलं खोटं रुप जगासमोर आणत आहोत आणि कोणीतरी आपल्याला सुंदर म्हणावं म्हणून हे सगळे करत आहोत याचा आवर्जून विचार करायला हवा.
बहुतांश वेळा मुली आपल्या चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स लपवण्यासाठी, सावळा रंग गोरा दिसण्यासाठी अशा प्रकारचे फिल्टर्स वापरतात. पण एकदा तसे वापरण्याची सवय झाली आणि आपलेच खोटे रुप जगासमोर मांडणे अंगवळणी पडले की खरे रुप किंवा खरा चेहरा जगासमोर आणण्याची आपल्यालाच लाज वाटायला लागते. यातून निर्माण होणारा न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता आणि या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परीणाम हे खऱ्या अर्थाने धोकादायक आहे याकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आपण असंख्य सकारात्मक गोष्टी वाचतो. विविध विषयातील माहिती आणि मदत मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. पण त्याच वेळी हा मिडीया आपल्याला उध्वस्थ करणाराही असू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.