कपडे हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. वेगवेगळ्या पॅटर्नचे, फॅशनचे कपडे आपण वापरत असतो. यातही ऑफीस वेअर, जिम वेअर, घरातले कपडे, थंडीचे कपडे, कॅज्युअल वेअर असे कपड्यांचे बरेच प्रकार असतात. आवडीने आपण कपडे घेतो खरे पण ते नीट वापरणेही अतिशय महत्त्वाचे असते. वेळच्या वेळी कपडे धुणे, त्यांना इस्त्री करणे, ते कपाटात नीट ठेवणे असा कपड्यांचा मेंटेनन्स नीट केला तर ते बराच काळ चांगले राहतात. काही जण बरेचदा तेच तेच कपडे न धुता वापरता, तर काही जण गरज नसतानाही सतत कपडे धुतात.मात्र हे दोन्हीही कपड्यांसाठी आणि आरोग्यासाठी चांगले नसते.पाहूयात टीशर्ट, जीन्स, स्वेटर, रात्री वापरण्याचे कपडे, फॉर्मल शर्ट असे वेगवेगळे कपडे किती वेळा वापरल्यानंतर धुवायला हवेत याबाबत आपल्या मनात काहीवेळा संभ्रम असण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण कोणते कपडे किती वेळा धुवावेत याबाबत समजून घेऊया (Know how frequently one should wash cloths)...
१. टी शर्ट
साधारण १ ते २ वेळा घातल्यावर धुवायला हवेत. कारण यामध्ये घाम शोषला जाण्याची, डाग पडण्याची शक्यता जास्त असते.
२. स्वेटर
थंडीच्या दिवसांत साधारण २ ते ३ महिने आपण स्वेटर वापरतो. अनेकदा दिवसातला बराच काळ हे स्वेटर आपल्या अंगावर असतात. साधारण ४ ते ५ वेळा वापरल्यावर हे स्वेटर अवश्य धुवायला हवेत.
३. कॉटन शर्ट
फॉर्मल शर्ट आपण साधारणपणे ऑफिस किंवा फॉर्मल वेअर म्हणून वापरतो. त्यामुळे ते जवळपास दिवसभर अंगावर असतात. असे शर्ट एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा वापरल्यावर धुवायला हवेत.
४. जॅकेट
जॅकेटचे मटेरियल वेगवेगळे असते. तसेच ते सतत धुणे शक्य नसते. त्यामुळे जॅकेट प्रत्येक सिझनमध्ये एकदा धुवायला हवेत.
५.जिम वेअर
जिममध्ये वापरलेल्या कपड्यांना घामाचा वास येतो. त्यामुळे हे कपडे रोजच्या रोज धुवायला हवेत.
६. जीन्स
जीन्स ही पिदडून वापरण्याची गोष्ट आहे. तसेच ती खूप जाड असल्याने सतत धुणे शक्यही नसते. त्यामुळे जीन्स साधारणपणे ८ ते १० वेळा वापरल्यावर धुतली तरी चालते.
७. टॉप
जीन्स वर आपण बरेचदा टॉप घालण्याला पसंती देत. हे टॉप खराब झाल्यावर म्हणजेच २ ते ३ वेळ वापरल्यावर धुवावेत.
८. झोपायचे कपडे
नाईट वेअर जर आपण फक्त रात्री झोपतानाच घालत असू तर ते ३ ते ४ वेळा वापरून मग धुतलेले चालतात.