नवरात्री, दिवाळी यांसारख्या सणावाराच्या काळात आपण पारंपरिक कपडे घालतो. साडी, पंजाबी ड्रेस, घागरा यांसारख्या कपड्यांवर आपण कधी मोत्याची, कधी खड्याची तर कधी सध्या ट्रेंडींग असलेली ऑक्सिडाइज ज्वेलरी वापरतो. गेल्या काही वर्षात ऑक्सिडाइज ज्वेलरीचा बराच ट्रेंड असून सिल्व्हर शेडमध्ये थोडी काळपट अशी ही ज्वेलरी विविध प्रकारच्या आऊटफिटसवर अतिशय छान उठून दिसते. अगदी वेस्टर्न कपड्यांसाठीही आपण ही ज्वेलरी आवडीने खरेदी करतो आणि वापरतोही. मात्र घाम, परफ्यूम किंवा प्रदूषण आणि अन्य काही गोष्टींमुळे हे कानातले, गळ्यातले, बांगड्या आहेत त्याहून जास्त काळ्या पडतात (Know How To Clean Oxidised Jewellery At Home) .
ही ज्वेलरी प्रमाणापेक्षा जास्त काळी झाली की त्याची मजा जाते आणि त्यातली डीझाईनही नीट दिसेनाशी होते. अशावेळी हे काळपट पडलेले महागडे दागिने पुढचे बरेच दिवस तसेच पडून राहतात. काळे झाले म्हणून इतके पैसे देऊन घेतलेले हे दागिने आपण टाकूनही देऊ शकत नाही. हे दागिने पाण्याने धुतले तर त्यात अडकलेली घाण काही प्रमाणात निघते पण ते चकाकतीलच असं नाही. अशावेळी घरच्या घरी हे ऑक्सिडाइज दागिने स्वच्छ करण्यासाठी आणि छान चमकवण्यासाठी आपण १ सोपा उपाय पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे झुमके, मोठ्या आकारातले कानातले, गळ्यातले किंवा अगदी वेगवेगळ्या डीझाईन्सच्या ऑक्सिडाइजच्या बांगड्या घातल्यावर छान दिसतात. या उपायामुळे जुने झालेले दागिने नव्यासारखे दिसतील आणि आपला लूक आणखी खुलून येण्यास मदत होईल.
१. एका बाऊलला अॅल्युमिनिअम फॉईल लावायचा आणि त्यामध्ये हे काळपट झालेले दागिने ठेवायचे.
२. त्यावर चमच्याने बेकींग सोडा घालून दागिने पूर्ण भिजतील इतके गरम पाणी ओतायचे.
३. साधारण १० मिनीटे हे सगळे असेच ठेवून द्यायचे.
४. नंतर हे दागिने बाहेर काढून एखाद्या सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे.
५. दागिन्यांवरचा काळा थर निघून गेलेला दिसतो आणि ते अगदी छान नव्यासारखे चकाकताना दिसतात.