आपलं घर आणि घरातील प्रत्येक वस्तू एकदम स्वच्छ आणि चकचकीत असावी अशी आपली इच्छा असते. रोजच्या धावपळीत आपण जमेल तितकी साफसफाी करण्याचा प्रयत्नही करतो, मात्र तरीही काही ना काही राहतंच. घरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी जागा म्हणजे स्वयंपाकघर. अगदी सकाळी उठल्यावर चहापासून ते रात्री झोपताना दुधापर्यंत घरातील प्रत्येकाला लागेल ते पुरवण्याची ही एकमेव जागा असते. नाश्ता, स्वयंपाक, पाहुणे आले की त्यांच्यासाठी काही ना काही, सणवार या सगळ्यांमध्ये ओट्याचा आणि त्यावरील गॅस शेगडीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. या स्वयंपाकघराची कितीही साफसफाई केली तरी ती कमीच पडते (Know How To Clean The Gas Stove Burner at Home).
स्वयंपाक झाल्यावर आणि विकेंडला आपण गॅस शेगडी, ओटा, टाईल्स स्वच्छ करतो. याचवेळी आपण गॅसमधील बर्नरही स्वच्छ करतो. पण ते म्हणावे तसे स्वच्छ होतातच असे नाही. नवीन आणल्यावर पितळी म्हणजेच पिवळट असणारे हे बर्नर कालांतराने वापरुन काळेकुट्ट होतात. कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं. कधी थेट बर्नरवर फुलके, वांगी, पापड भाजल्याने त्याचे कणही बर्नरमध्ये अडकतात आणि ते खराब होतात. हे खराब झालेले बर्नर झटपट अगदी कमी श्रमात साफ करायचे तर त्यासाठी १ सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे काही मिनिटांत काळे झालेले बर्नर चमकण्यास मदत होईल.
१. एका बाऊलमध्ये बर्नर ठेवून त्यावर एकदम गरम पाणी ओतायचे.
२. या गरम पाण्यातील बर्नरवर लिंबाची अर्धी फोड पिळायची.
३. इनो म्हणजेच फ्रूट सॉल्टचे १ पॅकेट यामध्ये घालायचे.
४. त्यानंतर यामध्ये साधारण चमचाभर मीठ आणि बेकींग सोडा घालायचा.
५. या सगळ्या गोष्टींचे रासायनिक मिश्रण तयार होते त्यामध्ये साधारण ४ तास बर्नर तसाच भिजत ठेवायचा.
६. मग बर्नर काढून तारेच्या घासणीवर लिक्विड सोप घेऊन त्याने बर्नर हलक्या हाताने घासायचा.
७. काही मिनीटांतच हा बर्नर नव्यासारखा चमकताना दिसेल.