पाण्याची बाटली ही आपल्यासोबत असणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी लहान बाळांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेच बाहेर पडताना आपल्या बॅगमध्ये शक्यतो पाण्याची बाटली सोबत ठेवतात. शाळेत, कॉलेजला किंवा ऑफीसला नेण्यासाठी आपण पाण्याच्या बाटल्या वापरतो. अनेकदा घरातही फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी बाटल्यांचा वापर केला जातो. यामध्ये अगदी साध्या प्लास्टीकपासून, स्टील, पितळ अशा विविवध प्रकारच्या बाटल्या आपण आवडीनुसार वापरत असतो. सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही. त्यामुळेच अनेकदा बाटल्यांमध्ये कुबट वास येतो किंवा बाटलीच्या झाकणात आणि तोंडाशी काळा थर जमा होतो ( Know how to Clean water bottles)
घाईघाईत बरेचदा बाहेर जाताना आपण ही बाटली आतून विसळतो आणि तसंच पाणी भरतो. पण असे केल्याने बाटलीतील ओलसरपणे आणि वास तसाच राहतो. याच बाटलीत पुन्हा पुन्हा पाणी भरुन प्यायले तर आरोग्याच्यादृष्टीने ते चांगले नसते. बाटली निमुळती असल्याने ती साफ कशी करायची असा प्रश्न अनेकांपुढे असतो. हल्ली बाजारात त्यासाठी वेगळे ब्रशही मिळतात पण आपल्याकडे ते ब्रश नसतील आणि घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने बाटली साफ करायची असेल तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी ५ ते १० मिनीटांत बाटली साफ व्हायला मदत होईल आणि आपले आरोग्यही चांगले राहील.
उपाय काय?
बाटली न वापरता नुसती ठेवून द्यायची असेल तर त्यामध्ये वास येऊ नये यासाठी वर्तमानपत्र किंवा कोणत्याही कागदाचे बोळे करुन त्यामध्ये घालावते. कागदामध्ये यातील मॉईश्चर शोषले जाते आणि बाटली ६ महिने न वापरता ठेवली तरीही त्यामध्ये अजिबात वास येत नाही. त्यानंतर जेव्हा ही बाटली वापरायची असेल तेव्हा त्यातील कागद काढायचे आणि मग ती स्वच्छ करुन पाणी भरुन वापरायची. यामुळे बाटली बरेच दिवस न वापरता ठेवली तरी त्यामध्ये कुबट वास येणार नाही. हा उपाय करायलाही सोपा असल्याने आपण तो अगदी सहज करु शकतो.