Join us  

साडी ड्रायक्लिनिंगला खूप पैसे जातात? घरीच करा ड्रायक्लिनिंग, सिल्कची साडी दिसेल नव्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 1:11 PM

Know How To Dry-clean Silk Saree at Home : ड्रायक्लिनींगचे दर अव्वाच्या सव्वा झाल्याने सिल्कची साडी धुण्याचा सोपा उपाय...

साडी आणि त्यातही सिल्कची साडी हा महिलांचा विक पॉईंट असतो. अगदी पहिल्या साडीपासून ते लग्नातली साडी, आवडीच्या व्यक्तींनी दिलेली साडी किंवा एखाद्या खास ठिकाणाहून आणलेली साडी असे साडीचे मोठे कलेक्शन महिलांच्या कपाटात असते. सिल्कमध्येही देशभरातील विविध राज्यांत, गावांत तयार होणाऱ्या साड्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या साड्या आपण आवडीने खरेदी करतो आणि वापरतोही. पण त्या साड्या वापरुन झाल्यावर त्याचा मेंटेनन्स करणे हेही एक अतिशय महत्त्वाचे काम असते. कारण लग्नाकार्यात किंवा कोणत्याही कार्यक्रमाला घातलेल्या या साड्यांवर अन्नपदार्थांचे, मेकअपचे किंवा मातीचे डाग पडतात. इतकेच नाही तर काही वेळा साडीला घामाचा किंवा ठेवणीतलाही वास येतो (Know How To Dryclean Silk Saree at Home). 

 जास्तीत जास्त २ ते ३ वेळा साडी नेसल्यानंतर ती धुवावीच लागते. सिल्कची महागाची साडी घरात धुतली तर ती खराब होईल असा आपला समज असतो. म्हणून आपण सिल्कची प्रत्येक साडी दरवेळी ड्रायक्लिनला टाकतो. साडीचा पोत चांगला राहावा म्हणून ती ड्रायक्लिन करणे केव्हाही जास्त चांगले. पण गेल्या काही वर्षात ड्रायक्लिनिंगच्या किमती इतक्या जास्त वाढल्या आहेत की एका साडीसाठी आपल्याला शे-पाचशे रुपये माोजावे लागतात. साडी नवीन असताना पहिल्या वेळी ड्रायक्लिनिंगला टाकणे ठिक आहे पण एकदा ती नेहमीच्या वापरात आली की नियमित ड्रायक्लिन करण्याची आवश्यकता नसते. त्यापेक्षा घरच्या घरी अगीद सोप्या पद्धतीने साडी कशी ड्रायक्लिन करायची ते पाहूया...  

(Image : Google)

1. एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्यायचे. त्यात 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा मीठ घालायचे.

2. यामध्ये आपण केस धुण्यासाठी वापरत असलेला शाम्पू किंवा लिक्विड साबण घालावा. 

3. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. 

4. एका बादलीत जितक्या साड्या ड्रायक्लीन करायच्या आहेत त्या अंदाजे पाणी घ्यावे आणि हे मिश्रण त्यामध्ये घालावे. 

5. या बादलीतील पाण्यात साडी 5 ते 10 मिनिटे भिजवावी. यामध्ये साडी घासण्यासाठी आपण साबण किंवा ब्रश यांचा अजिबात वापर करणार नाही. 

6. साडीचा सगळा मळ आणि वास या पाण्यामध्ये निघून जाण्यास मदत होते आणि साडी बाहेर ड्रायक्लीन केल्याप्रमाणे स्वच्छ होते. 

7. हे खराब पाणी फेकून दिल्यावर त्याच बादलीत साधे पाणी घ्यावे आणि त्यातून 2 ते 3 वेळा साडी खळबळून काढावी. म्हणजे राहिलेला मळ निघून जाण्यास मदत होते. 

8. सिल्कची साडी असल्यास ती थोडा वेळ निथळत ठेवावी आणि नंतर ती उन्हात वाळत न घालता सावलीमध्ये छान सुकवावी. ही साडी बाहेर ड्रायक्लीन केल्याप्रमाणे स्वच्छ होते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससाडी नेसणेहोम रेमेडी