आहारात विविध रंगाची, चवीची फळं असायला हवीत म्हणून आपण बाजारातून वेगवेगळी ताजी फळं आणतो. पण एखादवेळी ती खाल्ली गेली नाहीत किंवा थोडी जास्त पिकली की लगेच त्यावर माश्या-चिलटं बसतात. मग टेबलवर, ओट्यावर किंवा फ्रिजच्या वरच्या बाजूला ठेवलेल्या या फळांवर घोंघावणाऱ्या माश्या पाहून आपल्याला वैताग येतो. अनेकदा अशी माश्या फिरणारी फळं खाण्याचीही इच्छा होत नाही. केळी, पपई किंवा थोडे जास्त पिकलेले चिकू अशी ओलसर फळं असतील तर या माश्या किंवा चिलटं हमखास येतात (Know How To Get Rid of Fruit Flies Easily).
आजुबाजूच्या इतर पदार्थांवर किंवा वस्तूंवरही त्या बसायला लागतात आणि काही वेळात त्यांची संख्या वेगाने दुप्पट, तिप्पट होत वाढत जाते. वेगवेगळ्या ठिकाणी बसून आलेल्या या माश्या असंख्य किटाणू घेऊन वावरत असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही त्या घातक असतात. फळांवर माश्या बसू नये म्हणून आपण कधी त्यावर ताटली ठेवतो तर कधी एखादं कापड टाकतो. मात्र तरीही चिलटं किंवा माश्या हलायचं नाव घेत नाहीत. असे होऊ नये आणि फळांना किंवा आजुबाजूच्या कोणत्याच गोष्टींना माश्या लागू नयेत यासाठी काय करावं हे आपल्याला माहित नसतं. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यासाठीच एक अतिशय सोपी पण उपयुक्त अशी ट्रीक आपल्यासोबत शेअर करतात. पंकज के नुसके या खास सिरीजमध्ये त्या ही ट्रीक कोणती आणि ती कशी करायची ते सांगतात...
१. कोणत्याही फळाची एक फोड कापून घ्यायची आणि ती एका खोलगट बाऊलमध्ये ठेवायची.
२. याच बाऊलमध्ये ती फोड बुडेल इतके अॅपल साईडर व्हिनेगर टाकायचे.
३. थोडा जाडसर कागद घेऊन त्याचा कोनाचा आकार करायचा आणि हा कोन या बाऊलमध्ये ठेवायचा.
४. फळाच्या आणि अॅपल साईडर व्हिनेगरच्या वासाने माश्या आणि चिलटं या बाऊलजवळ येतात. पण ती कोनाच्या आत जाऊन कागदाला चिकटतात आणि व्हिनेगरमध्ये गेल्यावर मरतात.
५. अशाप्रकारे सगळ्या माशा या कोनामधून आत गेल्या की मग ती इतर फळांवर बसण्याचा प्रश्नच उरत नाही.