आपण साधारणपणे महिन्याचे किंवा २ महिन्याचे किराणा सामान एकत्र भरतो. यामध्ये आपण गहू, ज्वारी, तांदूळ यांसारखी धान्ये, डाळी, कडधान्ये आणि किराण्यातील इतरही गोष्टी भरतो. सतत सामान आणायला नको म्हणून आपण एकदाच थोडं जास्तीचं सामान भरतो. अंदाजे १.५ ते २ महिने आपल्याला हे सामान लागतेच पण कधी गावाला गेलो, कोणाकडे लग्नकार्य असेल किंवा बाहेर जास्त जाणं झालं तर किराणा सामान संपत नाही. काहीवेळी ट्रॉली किंवा कपाटात किराण्याचे डबे जास्त दिवस बंद राहिल्याने किंवा किराणा सामान जुने झाल्याने त्यामध्ये जाळी आळी होते नाहीतर पोरकीडे होतात (Know How to Prevent dal from infestation).
पोरकीडे डाळी कुरतडतात आणि त्यांचे पीठ करतात. पोरकीडे झालेले जिन्नस आपल्याला स्वयंपाक करताना एकतर चाळून नाहीतर धुवून घ्यावे लागतात. त्याशिवाय त्यातील किडे जात नाहीत. पण अशाप्रकारे डाळीत किंवा तांदूळात पोरकीडे होणे आणि ते किडे असलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पण किराण्यात अशाप्रकारे पोरकीडे होऊच नयेत यासाठी १ सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया हा उपाय सांगत असून तो कसा करायचा पाहूया...
उपाय काय?
डाळ, धान्य किंवा कडधान्यात किडे होऊ नयेत म्हणून त्यात मसाल्याचे पदार्थ घालावेत असे सांगितले जाते. पण त्यापेक्षा आणखी एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. डाळीच्या डब्यात किंवा बरणीत चमचाभर मीठ घालून ठेवल्यास त्याचा पोरकीडे होऊ नये म्हणून अतिशय चांगला फायदा होतो. मीठ उग्र असल्याने कदाचित पोरकीडे डाळीत येत नसतील. तसेच डाळ शिजवताना आपण त्यात मीठ घालतोच. त्यामुळे मीठाची चव थोडी डाळीत उतरली तरी त्याने फार काहीच फरक पडत नाही. हा उपाय अतिशय सोपा असल्याने डाळी साठवताना त्याचा अवश्य वापर करायला हवा. डाळ बरेच महिने चांगली राहण्यास चांगली मदत होईल.