Join us  

फ्रिज उघडला की आतून कुबट वास येतो? ३ सोप्या ट्रिक्स, फ्रिजमधला वास होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 11:41 AM

Know How To Remove bad Smell from Fridge : फ्रिज साफ केल्यावरही काही वेळा त्यातून वास येतो अशावेळी काय करावे याविषयी...

रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिज हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट झाला आहे. दुधापासून ते सुकामेवा, विविध प्रकारचे मसाले, पीठं आणि फळं-भाजीपाला साठवण्यासाठी आपण सगळेच सर्रास फ्रिजचा वापर करतो. याशिवाय उरलेले अन्नपदार्थ ठेवण्यासाठीही फ्रिजचा वापर केला जातो. अनेकदा आपण हा फ्रिज वापरत राहतो पण तो साफ करायला आपल्याला वेळ होतोच असे नाही. अशावेळी फ्रिजमधून एकप्रकारचा कुबट वास यायला सुरुवात होते. याशिवाय फ्रिज साफ केल्यावरही काही वेळा त्यातून वास येण्याची शक्यता असते (Know How To Remove bad Smell from Fridge). 

आता हा वास येण्यामागे बरीच कारणे असू शकतात. फ्रिजचे तापमान, आतमध्ये असलेले पदार्थ, काही सांडल्याने किंवा बराच काळ फ्रिज साफ न केला गेल्यानेही फ्रिजमधून असा वास येऊ शकतो. हा वास असह्य होतो आणि आरोग्यासाठीही अशाप्रकारे वास येणाऱ्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवणे चांगले नाही. अशावेळी हा वास घालवण्यासाठी नेमके काय करायला हवे याच्या काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)

१. टी बॅग

बरेच लोक चहा पावडरच्या ऐवजी चहा करण्यासाठी टी बॅग्जचा उपयोग करतात. याच टी बॅगच्या साह्याने आपण फ्रिजमधील वास दूर करु शकतो. यासाठी आपल्याला अतिशय सोपी गोष्ट करायची आहे. वापरलेली टी बॅग फेकून न देता ती टी बॅग एका बाऊलमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवून द्यायची. यामुळे टी बॅग फ्रिजमध्ये येणारा सगळा वास शोषून घेईल आणि फ्रिजमधील वास त्यामुळे दूर होण्यास मदत होईल. 

२. कॉफी

कॉफी ही अनेकांच्या आवडीचा विषय असते. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी किंवा कॉफी फ्लेवरचे वेगवेगळे पदार्थ हे लोक अतिशय आवडीने खातात. हीच कॉफी फ्रिजमधील वास दूर करण्यासाठीही अतिशय उपयुक्त असते. कॉफीचा वास स्ट्राँग असतो त्यामुळे फ्रिजमधील खराब वास जाऊन चांगला वास येण्यास त्याची मदत होते. फ्रिजमध्ये वास येत नसेल तरीही महिन्यातून २ वेळा ही ट्रिक वापरल्यास फ्रिज चांगला राहण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. लिंबू

आपण बरेचदा लिंबू फ्रिजमध्ये ठेवतो आणि ते वाळून जाते. त्यापेक्षा लिंबाचे ४ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवा. त्यावर थोडा बेकींग सोडा घाला. १ दिवस जरी हे लिंबाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले तर फ्रिजमधील सगळा वास या लिंबांमध्ये शोषला जाईल आणि फ्रिजमधून वास गायब होईल. याशिवाय आठवड्यातून किमान एकदा फ्रिज कोरड्या किंवा ओल्या फडक्याने साफ करायला हवा. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स