आपण केसांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावतो. इतकंच नाही तर थंडीच्या दिवसांत अंगाला कोरड पडल्याने आपण अंगाला आणि पायांनाही तेलाने मसाज करतो. अशाप्रकारे कुठेही तेल लावले तरी हे तेल आपण झोपतो त्या बेडशीट, उशीला लागते आणि हे सगळेच तेलकट होते. तेलाचे डाग एकदा पडले की लवकर निघत नाहीत कारण तेल कापडात मुरते आणि मग कितीही घासले तरी ते डाग तसेच राहतात (Know How to Remove Oil Stain From Bedsheet)...
अनेकदा हे तेल जास्त प्रमाणात लागले तर त्याठिकाणी तेलकटही वाटते आणि उशी किंवा बेडशीटला तेलाचा वासही यायला लागतो. त्याच बेडशीटवर पुन्हा झोपणे आपल्याला अस्वच्छ वाटते. बेडशीट जड असल्याने आपण ते रोज धुत नाही. पण हे तेलाचे डाग घालवण्यासाठी नेमकं काय करायचं ते आपल्याला समजत नाही. त्यासाठीच पाहूयात ३ सोपे घरगुती उपाय.
१. बेकींग सोडा
बेकींग सोडा हा स्वच्छतेच्या बहुतांश कामात अतिशय उपयुक्त ठरणारा घटक आहे. ओटा, टाईल्स, गॅस शेगडी, सिंक स्वच्छ करण्यासाठी बेकींग सोड्याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे कापडावरचे तेलाचे डाग काढण्यासाठीही हा सोडा उपयोगी येतो. एका बाऊलमध्ये २-३ चमचे बेकींग सोडा घ्यायचा. त्यात २ चमचे लिंबाचा रस घालून घट्टसर पेस्ट तयार करायची. डाग पडलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावून १० मिनीटे ठेवायचे आणि त्यानंतर बेडशीट साफ करायचे. तेलाचे डाग सहज निघून जातात.
२. व्हिनेगर
एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे व्हिनेगर घालायचे. मग त्यामध्ये लिंबाचा रस आणि बेकींग सोडा घालून हे सगळे एकजीव करायचे. नंतर त्यात अर्धा कप पाणी घालून चांगले मिश्रण तयार करायचे. आता हे मिश्रण थोडे कोमट करुन डाग पडलेल्या भागावर घालायचे आणि ५ मिनीटे तसेच ठेवायचे. मग हात किंवा ब्रशने हा भाग घासायचा, डाग अगदी सहज निघून जातात.
३. अमोनिया पावडर
अमोनिया पावडर ही एक अतिशय उत्तम क्लिनिंग सोल्यूशन आहे. या पावडरमुळे साध्या ब्रश आणि साबणाने न निघणारे डाग अगदी सहज निघतात. २ ते ३ चमचे पावडर घेऊन त्य़ात लिंबाचा रस आणि पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करायचे. त्यानंतर हे मिश्रण डागांवर लावून काही वेळाने डाग घासायचे. तेलकट डाग निघण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो.