उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमान जास्त असल्याने भाज्या, फळे या नाशवंत गोष्टी पटकन वाळतात. पण आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, लिंबू या सगळ्या गोष्टी सारख्या लागतात. बाजारातून सतत या गोष्टी विकत आणणे शक्य नसते. अशावेळी आपण बाजारातून एकदाच आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवतो. पण पैसे देऊन आणलेला हा भाजीपाला दिर्घ काळ चांगला टिकावा यासाठी तो कसा साठवून ठेवायचा हे आपल्याला माहिती असायला हवं. नाहीतर ४ दिवसांतच मिरच्या आणि कडीपत्ता वाळून जातात. कोथिंबीरही वाळून पिवळी पडते. तर लिंबू चॉकलेटी होतात आणि कडवट लागतात. पाहूया मसाल्याचे हे सगळे पदार्थ फ्रिजमध्ये साठवून ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स (Know How To Store Coriander, Curry Leaves, Mint Leaves, Lemon, Green Chillies in Summer) .
१. मिरच्या
एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवा. त्यानंतर मिरच्या कोरड्या करुन घ्या. एका काचेच्या किंवा प्लास्टीकच्या डब्यामध्ये टिश्यू पेपर घालून त्यावर या मिरच्या ठेवा. त्यावरुन आणखी एक टिश्यू पेपर घालून डब्याचे झाकण घट्ट लावून डबा फ्रिजमध्ये ठेवा.
२. लिंबू
एका काचेच्या डब्यात किंवा बरणीत लिंबं ठेवा. त्यामध्ये लिंबं पूर्ण बुडतील इतके पाणी घाला आणि डब्याचे किंवा बरणीचे झाकण घट्ट लावून घ्या. त्यानंतर हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. आपण लिंबं तशीच फ्रिजमध्ये ठेवतो त्यामुळे ती वाळून जातात आणि कडक होतात. दर २ ते ३ दिवसांनी या बरणीतील पाणी बदलायचे.
३. पुदीन्याची पाने
पुदीन्याची पाने काड्यांपासून काढून वेगळी करा. त्यानंतर एका काचेच्या कोरड्या केलेल्या बरणीमध्ये ही पाने काढून ठेवा. त्यावर एक टिश्यू पेपर लावा आणि बरणीचे झाकण घट्ट लावून टाका.
४. कडीपत्ता
कडीपत्ताही फ्रिजमध्ये किंवा बाहेरही लगेच वाळून जातो आणि त्याचा स्वाद कमी होतो. अशावेळी कडीपत्त्याची पाने काढून ठेवावीत आणि ती वाळवावीत. मग एका बरणीत ही पाने भरुन ठेवावीत. त्यावर टिश्यू पेपर लावून बरणीचे झाकण लावून ठेवायचे.
५. कोथिंबीर
कोथिंबीर योग्य पद्धतीने निवडून ठेवावी. त्याची पिवळी आणि काळी पाने काढून टाकायची. डब्यात टिश्यू पेपर घालून त्यावर हिरवीगार कोथिंबीर ठेवावी आणि वरुन पुन्हा टिश्यू पेपर घालून डब्याचे झाकण लावून टाकावे. असे केल्याने कोथिंबीर १० ते १२ दिवस चांगली राहण्यास मदत होते.