पावसाळ्याच्या दिवसांत आपण आवर्जून आल्याचा चहा पितो. विविध पदार्थांमध्येही आलं वापरतो. आलं उष्ण असल्याने या काळात ते वापरणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. घसादुखी, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांवरही आलं फायदेशीर ठरतं. मात्र या काळात हवेत ओलावा आणि दमटपणा असल्याने घरात कोणत्याही वस्तू आणल्या की त्या लगेच खराब होण्याची शक्यता असते. एकतर हे आलं खूप वाळून कडक होतं. नाहीतर त्यावर एकप्रकारची बुरशी येते. हे आलं ओलसर असेल तर ते सडल्यासारखे होते आणि त्यावर चिलटं बसायला सुरुवात होते (Know How To Store Ginger Properly).
एकदा हे आलं खराब व्हायला लागलं की ते न वापरता फेकून द्यावे लागते. त्यामुळे आलं तर वाया जातंच पण आपण पैसे देऊन आणल्याने आपले पैसेही वाया जातात. हेच आलं फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते एकतर कडक होते नाहीतर त्याला पाणी सुटून ते सडल्यासारखे होते. असे होऊ नये आणि आलं चांगलं टिकावं यासाठी नेमकं काय करता येईल याबाबत इन्स्टाग्रामवर आळशी हॅकस नावाने खास ट्रिक देण्यात आली आहे, ती कोणती पाहूया...
१. सगळ्यात आधी एक टिश्यू पेपर घेऊन त्याने आलं पूर्णपणे घासून साफ करुन घ्या. त्यामुळे यावरची माती आणि इतर गोष्टीही निघून जाण्यास मदत होईल.
२. त्यानंतर एक एअरटाइट बॅग घ्यावी आणि त्यामध्ये हे आलं घालून ठेवावं. यामुळे आल्याला पाणी सुटत नाही.
३. साधारणपणे आपण एखाद्या बाऊलमध्ये आलं उघडं ठेवतो त्यामुळे एकतर ते वाळून जाते आणि बंद डब्यात ठेवलं तर त्याला पाणी सुटते आणि ते खराब होते.
४. मात्र वर सांगितल्याप्रमाणे आलं साफ करुन प्लॅस्टीकच्या एअर टाइट बॅगमध्ये ठेवल्यास जवळपास १ महिन्यापर्यंत हे आलं आहे तसंच राहते.
५. यामुळे एखाद्या पदार्थात किंवा चहामध्ये, वाटणामध्ये आलं घालायचं असेल तर तुम्हाला अगदी फ्रेश आलं मिळेल.