एखादा सण असो किंवा लग्नकार्य नाहीतर आणखी काही असलं की आपण अतिशय आवडीने साडी नेसून या कार्यक्रमाला उपस्थिती लावतो. वजनाला हलक्या आणि दिसायला सुंदर असल्याने आपण या साड्या नेसण्याला पसंती देतो. बऱ्याचदा काठापदराच्या साड्या या सिल्कच्या असतात. कधी घामाने, कधी अन्नपदार्थ सांडल्याने किंवा कधी आणखी काही कारणाने या साड्या खराब होतात. किमान २ वेळा वापरल्यानंतर या सिल्कच्या साड्या आपण धुवायला टाकतो. सिल्कची साडी घरी धुतल्याने खराब होऊ नये, तिचा पोत जुना वाटू नये यासाठी आपण या साड्या ड्रायक्लिनिंगला टाकतो. पण गेल्या काही वर्षात ड्रायक्लिनिंगच्या किमती इतक्या जास्त वाढल्या आहेत की एका साडीसाठी आपल्याला शे-पाचशे रुपये माोजावे लागतात. साडी नवीन असताना पहिल्या वेळी ड्रायक्लिनिंगला टाकणे ठिक आहे पण एकदा ती नेहमीच्या वापरात आली की नियमित ड्रायक्लिन करण्याची आवश्यकता नसते. मग आता या सिल्कच्या महागड्या साड्या नेमक्या कशा धुवायच्या ते पाहूया (Know How To Wash Silk Saree at Home)...
१. सिल्कच्या साडीची चमक आणि रंग आहे तसा राहावा यासाठी ही साडी धुताना अतिशय काळजीपूर्वक धुवावी लागते.
२. शक्यतो एकदा किंवा दोनदा वापरल्यानंतर साडी धुवू नये तर किमान ४ ते ५ वेळा वापरल्यानंतर धुवावी.
३. सिल्कची साडी डिटर्जंट किंवा गरम पाण्याने धुतल्यास खराब होऊ शकते. त्यामुळे या साड्या धुताना गरम पाणी अजिबात न वापरता गार पाण्याचा वापर करावा.
४. साडी धुण्याआधी गार पाण्यात भिजवून ठेवा. साधारण २ ते ३ तास साडी चांगली भिजल्यानंतर त्यामध्ये २ चमचे पांढरे व्हिनेगर घाला आणि १० मिनीटे साडी तशीच राहूद्या.
५. यानंतर या साडीला ब्रश न लावता हातानेच स्वच्छ करा. अगदीच एखादा डाग निघत नसेल तर तेवढ्याच डागापुरते डिटर्जंट वापरा. मात्र डिटर्जंट खूप स्ट्रॉंग नसेल आणि जास्त प्रमाणात नसेल याची काळजी घ्या.
६. तसेच धुवून झाल्यानंतर ही साडी खूप जास्त न पिळता पाणी निथळण्यासाठी थोडा वेळ तशीच ठेवा, म्हणजे यातील पाणी निघून जाण्यास मदत होईल. खूप जोर लावून पिळल्याने साडीचा पोत खराब होण्याची शक्यता असते.
७. साडी वाळत घालताना याठिकाणी खूप जास्त सूर्यप्रकाश नसेल असे पाहा. घरात, बाल्कनीत अशाठिकाणी साडी वाळण्यासाठी घाला. कडक उन्हात साडी वाळत घातली तर त्याचा रंग फिका पडण्याची शक्यता असते.