आईचं प्रेम काय असतं हे आपल्याला कोणी वेगळं सांगायची गरज नाही. कारण आपण प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतच असतो. आता माणसांमध्येच प्रेमभावना असते असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. पण प्राण्यांमध्येही ही प्रेमाची भावना तितकीच असते, मग ते पाळीव प्राणी असोत किंवा जंगली. जंगलातील प्राणी हिंस्र असतात असा आपला समज असतो. मात्र त्यांच्यातही मायेचा झरा असतोच. विशेषत: आई म्हणून पिलांना जन्म देणाऱ्या प्रत्येक सजीवामध्ये हा ममतेचा झरा असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (leopard Cub Reunites With Mother Video Viral on Social Media).
यामध्ये एक बिबट्या आपल्या पिल्लाला तोंडात धरुन सुरक्षित ठिकाणी ठेवताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मातृप्रेमाविषयच्या चर्चांनी वेग धरला आहे. भारतीय वनाधिकारी परवीन कस्वान यांनी नुकताच हा व्हिडिओ ट्विट केला असून व्हिडिओच्या सुरुवातीलाच बिबट्या आपल्या बछड्याला तोंडात धरुन घेऊन जाण्याच्या बेबात असल्याचे दिसते. मग काही सेकंदांसाठी बिबट्या बछड्याला खाली ठेवतो. आणि मग बिबट्या या बछड्याला तोंडात पकडून झाडीत जाताना दिसतो. मांजर ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना तोंडाने मानेत पकडते त्याचप्रमाणे बिबट्याही आपल्या जबड्यात या बछड्याला पकडताना दिसतो.
What can be more beautiful than this. Cubs were secured & then mother came and took her back. Yesterday night. pic.twitter.com/snwEU7rQbb
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 20, 2022
या व्हिडिओला कॅप्शन देताना कस्वान लिहीतात, “आई आली आणि बछड्याला घेऊन गेली त्यामुळे तो सुरक्षित झाला, याहून सुंदर आणखी काय असू शकते.” म्हणजे हा बिबट्या बछड्यांना ठेवून शिकार करण्यासाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी जंगलात गेला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. बऱ्याच जणांनी तो रिट्विट केला असून आई आणि मुलाच्या नात्याविषयी किंवा प्रेमाविषयी आपल्या भावना या माध्यमातून लोकांनी व्यक्त केल्या आहेत.