मुलं बिनधास्त असतात तर मुली लाजाळू हा काळ आता मागे गेला. मुलीही आता मुलांइतक्याच कदाचित त्यांच्याहून जास्त बिनधास्त झालेल्या पाहायला मिळतात. अशाच बिनधास्त नवरीचा एक व्हिडियो नुकताच समोर आला आहे. लग्नसराई जवळ आली की नवरा-नवरीचे वेगवेगळ्या अंदाजातील व्हिडियो व्हायरल होताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडियो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक नवरी स्वत:च चारचाकी चालवत आपल्या लग्नाच्या ठिकाणी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा लग्नाचा लूकही अतिशय उठून दिसत असून लेहंगा, दागिने यामध्ये ही नवरी मुलगी अगदी देखणी दिसत आहे. तिच्या हातावरील मेहंदी, तिचा चुडा यामध्ये उठून दिसत आहे.
तिचे नाव आकृती सेठी असून तिचा हा व्हिडियो मेकअप आर्टीस्ट परुल गर्ग हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या रिलमध्ये नवरी मुलगी गाडी चालवत असतानाच तिच्या मागे ‘विवाह’ चित्रपटातलं ‘हमारी शादी में’ हे गाण सुरू आहे. या गाण्यावर नवरीने नेमका ताल धरलेला दिसून येत आहे. आयुष्यातल्या सर्वात खास दिवसासाठी आणि क्षणासाठी ही नवरी खूपच उत्सुक दिसून येतेय. त्यामुळे ती कोणाचीही वाट न पाहता स्वत:च गाडी चालवत लग्नस्थळी निघाल्याचे दिसतंय. आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. ‘मिलन की जल्ही है.....’ हे या गाण्यातील कडवे या रीलला जोडण्यात आले आहे. लग्नाच्या ठिकाणी अशाप्रकारे एका वेगळ्या आणि हटके अंदाजात जाणारी ही तरुणी पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. २ दिवसांत या रिलला इन्स्टाग्रामवर जवळपास १ लाखांच्या घरात व्ह्यू मिळाले असून ७० हजारांहून अधिक जणांनी त्या व्हिडियोला लाईक केले आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.