मसाला डोसा आपल्यापैकी अनेकांना आवडतो. झटपट होणारा, पोटभरीचा हा गरमागरम डोसा आणि सोबत सांबार, चटणी म्हणजे सुखच. साऊथ इंडियन रेसिपी असलेला हा डोसा आता देशातच नाही तर जगातही प्रसिद्ध आहे. त्याचे एकाहून एक भन्नाट प्रकार आता हॉटेलमध्ये पाहायला मिळतात. पण याच मसाला डोसाचे कोणी आइस्क्रीम केले तर? ऐकूनही नकोशी वाटेल अशी गोष्ट नुकतीच ट्राय करण्यात आली आहे. या मसाला डोसा आइस्क्रीम रोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
The ACTUAL PANDEMIC pic.twitter.com/E8EMm6pcpd
— Divya Bhandari Kamra (@foodie_woman_) January 15, 2022
यामध्ये आइस्क्रीम तयार करणारा माणूस चक्क डोसा, बटाट्याची भाजी आइस्क्रीमच्या तव्यावर घेऊन कट करतो. त्यावर तो आइस्क्रीम घालतो आणि पुन्हा ते पसरवून त्याचे आइस्क्रीम रोल तयार करतो. हे रोल तयार झाल्यावर ते डीशमध्ये ठेऊन त्यावर बटाटा भाजी आणि सोबत चटणी दिली जाते. दिव्या भंडारी कामरा हिच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून चांगल्या पदार्थाची अशी वाट लावल्याबद्दल अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकताच असा चॉकलेट पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि त्यावरही नेटीझन्सनी काहीशा रागवून प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
याबरोबरच समोशात गुलाबजामचे सारण, रुह अफजा घालून केलेली मॅगी आणि चहा, जिलबी चाट, ओरिओ बिस्कीट भजी असे एकाहून एक भन्नाट पदार्थ लोक ट्राय करताना दिसतात. विशेष म्हणजे पदार्थांची अशी वाट लावण्यामध्ये त्यांना फार कौतुक वाटते. पण सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्याला नावं ठेवली की मग ते भलतेच ट्रोल होताना दिसतात. जो पदार्थ आहे तसा खावा ना, पण ते नाही. त्यात थोडाफार बदल केला तर ठिक आहे, पण इतक्या फ्लेवरचे आइस्क्रीम बाजारात मिळत असताना हे डोसा आइस्क्रीम कशाला हवंय हे मात्र न उलगडलेलं कोडं आहे. हे असले भन्नाट प्रकार कोण घेऊन खात असेल तेही माहित नाही. हा व्हिडिओ कोणत्या शहरातला आहे याचा कोणताही संदर्भ नसला तरी अशाप्रकारचे काही खाण्याचे धाडस करणारे लोक अजबच म्हणायला हवेत.