हौसेला मोल नसतं हेच खरं.. त्यात लग्नासारखा प्रसंग.. त्यामुळे मग लग्नात खर्च करताना मागे- पुढे बघितलं जात नाही.. काही काही लग्नात तर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. नेमकं हेच तर नको होतं पश्चिम बंगालच्या संदीपन आणि अदिती या जोडप्याला. आपलं लग्न कमीतकमी खर्चात पण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी या दोघांचीही इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने लग्न केलं तो सध्या सगळ्या देशभरातच एक कौतूकाचा विषय झाला आहे...
तर त्याचं झालं असं की संदीपन आणि अदिती या दोघांनाही लग्नात वारेमाप खर्च होणं नको होतं. त्यामुळे कमीतकमी लोकांमध्ये आणि कमीतकमी खर्चात कसं लग्न होईल, याचं ते नियोजन करत होते. लग्नाचं नियोजन सुरू असतानाच कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला. रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मग लॉकडाऊन लागलं नाही, पण अनेक गोष्टींवर लग्न- समारंभावर बंधने आली. लग्नाला वऱ्हाडी किती येणार, याचाही आकडा खूप कमी झाला. या गोष्टीचाही फायदा संदीपन आणि अदिती यांनी करून घेतला आणि खूपच कल्पक पद्धतीने लग्न केलं.
संदीपन आणि अदितीच्या घरांमध्ये १८ किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशी संदीपन छानपैकी लग्नाचे कपडे घालून तयार झाला. घराबाहेरची सायकल घेतली आणि सायकल चालवतच अदितीच्या घरी गेला. अदितीच्या घरी अगदी मोजकी मंडळी उपस्थित होती, पण तिच्या घरी त्यांचं लग्न ऑनलाईन पद्धतीने दूरच्या पाहुण्यांना बघता येईल, अशी सगळी व्यवस्था केलेली होती. मग लग्नघटिका जवळ आल्यावर संदीपन आणि अदितीने एकमेकांना वरमाला घालून लग्न केलं. ते त्यांच्या नातलगांनी, मित्र परिवाराने ऑनलाईन पद्धतीने बघितलं.
या लग्नाची आणखी एक खास गंमत म्हणजे लग्न लागताच ऑनलाईन पद्धतीने लग्न बघणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या घरी ऑनलाईन जेवण पाठविण्याची व्यवस्थाही संदीपन आणि अदितीने केलेली होती. त्यामुळे घरबसल्या जेवणाचा आस्वाद मिळाला, म्हणूनच वऱ्हाडी मंडळीही भलतीच खुश होऊन गेली. म्हणूनच तर अशा या भन्नाट पद्धतीने झालेल्या लग्नाचा विषय सध्या सोशल मिडियात चांगलाच गाजतो आहे.