बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरसोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव असतात. गेल्या काही दिवसांपासून ते आपले फोटो आणि व्हिडिओ याद्वारे लोकांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर त्यांचे त्यांच्या आईबरोबरचे काही व्हिडिओज याआधीही व्हायरल झाले होते. त्यांचे आणि त्यांच्या आईचे प्रेम पाहून त्यांचे फॅन्स त्यांच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंटस करत असतात. नुकताच त्यांनी आईच्या पदराविषयी भाष्य करणारी एक पोस्ट आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आणि अगदी कमी वेळात ती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यांच्या या पोस्टमुळे नेटीझन्स भावूकही झाले.
ते म्हणतात, लहान शहरांमध्ये आईच्या पदराचे किती महत्त्व असते. कधी डोळे पुसायला तर कधी जेवल्यानंतर तोंड पुसायला आईचा पदर उपयोगी पडतो. तो धरुन कुठे निघालो की आपल्याला गुगल मॅपची काहीच गरज नसते. थंडीच्या दिवसांत उब देणारा तर उकाड्यात फॅन होणाऱ्या आईच्या पदराची जागा जगातील कोणतीच वस्तू घेऊ शकत नाही. इतकेच नाही तर हा पदर म्हणजे चालती फिरती बँक असते. त्यात बांधलेले पैसे काढून आईने कित्येक खर्च केलेले असतात. वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले प्रसाद बांधण्याचे हे एक मोठे साधन असते हे सांगताना अनुपम खेर यांच्या डोळ्यांतील बोलके भाव आपल्याला भावूक करतात. याच पदरामध्ये आई कधी हसलेली असते, कधी लाजलेली असते तर कधी रडलेलीही असते असेही ते या व्हिडिओच्या शेवटी म्हणतात.
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना अनुपम खेर ‘आईचा पदर - आपल्यातील किती जणांनी कधी ना कधी वापरलाच असेल, त्याबद्दल जरुर सांगा’ अशी कॅप्शन दिली आहे. आईचा पदर ही आई आणि मूलातील एक महत्त्वपूर्ण साखळी असते. त्याच्याशी आपल्या किती आठवणी जोडलेल्या असतात. अजूनही आईचा पदम माझ्यासाठी सुरक्षेचे पांघरुण आहे. तुमच्या आईचे नाव माझ्यासोबत शेअर करा असे म्हणत मॉं की जय हो असेही ते आपल्या कॅप्शनमध्ये शेवटी म्हणतात. आईचा पदर म्हणजे जादूचा स्पर्श असे ते आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हणतात. या व्हिडिओला आतापर्यंत ५० लाख व्ह्यूज मिळाले असून असंख्य लोकांनी यावर कमेंटस करत आपल्या आईचे नाव लिहीले आहे. आपल्या आईच्या पदरासोबत असलेल्या आठवणी नेटीझन्सने या व्हिडिओच्या खाली शेअर केल्या आहेत. अतिशय भावूक करणारा हा व्हिडिओ पाहून कदाचित आपले डोळे पाणावू शकतात.