आपल्या देवघरातील देवांना फूले व हार अर्पण करून आपण रोज त्यांची मनोभावे पूजा करतो. देवघर सजवण्यासाठी आपण विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर करतो. काही सणवार असेल किंवा काही खास क्षण असेल तर आपण फुलांनी घर सुशोभित करतो. फुलांच्या माळा, फुलांचे हार, वेगवेगळ्या प्रकारची फुल आपण घेतो आणि सजावटीसाठी त्यांचा वापर करतो. परंतु ही फुलांची सजावट केवळ एका दिवसापुरतीच मर्यादित असते. ही फुल कोमेजून गेली की आपण त्यांना कचऱ्याच्या पेटीत टाकून देतो. पण थोडासा विचार केला तर आपण या फुलांचा पुनर्वापर करू शकतो. या फुलांचा पुनर्वापर करताना आपण फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढतो, खत म्हणून झाडात टाकतो अशा विविध प्रकारे आपण त्यांचा पुनर्वापर करतो. परंतु याच फुलांच्या पाकळ्यांपासून आपण पूजेसाठी हवन कप्स बनवू शकतो. हे हवन कप्स वापरून आपण घरातील वातावरण फ्रेश ठेवू शकतो. महागडे एअर फ्रेशनर वापरण्यापेक्षा हवन कप्स वापरून आपण नैसर्गिक पद्धतीने घर सुगंधित ठेवू शकतो(Make incense cups at home using flowers : DIY havan cups).
नक्की काय करता येऊ शकत ?
१. एकदा वापरून जुन्या झालेल्या हरातील फुले व पाने काढून घ्या.
२. या फुलांच्या पाकळ्या व पाने वेगळे काढून ते उन्हांत वाळवून घ्यावेत.
३. एक बाऊल घेऊन त्यामध्ये उन्हांत वाळवून घेतलेल्या फुलांच्या पाकळ्या व सुकलेली हरातील पाने ओता.
४. या मिश्रणात थोडासा धूप मिसळा.
५. आता या मिश्रणात मध ओता.
६. मधासोबतच या मिश्रणात तूप घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
७. फुलांच्या पाकळ्या व सुकलेली हरातील पाने हे खूपच ड्राय असल्यामुळे ते व्यवस्थित भिजून एकत्रित येतील इतक्या प्रमाणात तूप घ्या.
८. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर एक कपकेक ट्रे किंवा बेकिंग ट्रे घेऊन त्यात हे मिश्रण गोल आकारात बसवून घ्या.
९. आता हे मिश्रण वाळवून घ्या.
१०. काही तासानंतर हे मिश्रण वाळल्यावर काटा चमच्याच्या मदतीने हे हवन कप्स काढून घ्या.
ankita.s.rai या इंस्टग्राम पेजवरून हवन कप्स वापरून आपण नैसर्गिक पद्धतीने घर कसे सुगंधित ठेवू शकतो याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हवन कप्स वापरताना...
१. हे हवन कप्स एका हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर करून घ्या.
२. जेव्हा तुम्हाला हवन करायचे असेल तेव्हा हवन कुंडात थोडासा धूप घालून हे हवन कप्स टाका त्यानंतर काडेपेटीच्या मदतीने हे हवन कप्स पेटवून घ्या.
३. या हवन कप्समध्ये असलेल्या फुलांच्या पाकळ्या, तूप, मध यांच्या एकत्रित सुगंधाने घर दरवळून निघेल.
४. घरात येणाऱ्या पाहुण्यांना फ्रेश वाटावे म्हणून आपण महागड्या एअर फ्रेशनरचा वापर करतो. त्याऐवजी आपण या नैसर्गिक हवन कप्सचा वापर करून घर सुगंधित करू शकतो.