मुमताज- शाहजहान यांच्या अपूर्व प्रेमाची निशाणी (love story) म्हणून तयार झालेला ताजमहाल आपल्यालाच काय पण सगळ्या जगाला माहिती आहे. असा ताजमहाल मी तुझ्यासाठी बांधीन.... असं म्हणत अनेक तरुण त्यांच्या मैत्रीणीला आजही पटवत असतात... मुलगी पटते, लग्न होतं आणि संसारही होतो, पण बायकोला ताजमहाल बांधण्याचं दाखवलेलं स्वप्न स्पप्नच राहून जातं. ... पण मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) राहणाऱ्या एका प्रेमवीराने हे स्वप्न मात्र खरं करून दाखवलं आहे. बायकोसाठी त्याने हुबेहुब ताजमहाल (Taj Mahal replica) वाटावा असं घरच बांधून दिलं आहे. त्यांच्या प्रेमाची ही निशाणी सोशल मिडियावर सध्या चांगलीच व्हायरल (social viral) होत आहे.
आपल्या बायकोसाठी ताजमहाल बांधून देणारी ही व्यक्ती मध्यप्रदेशातल्या बुरहाणपुर येथील रहिवासी असून ते तिथले चांगलेच प्रसिद्ध व्यापारी आहेत म्हणे. आनंदप्रसाद चोकसे असं त्याचं नाव. त्यांनी त्यांच्या बायकोसाठी बुरहाणपुर येथे ताजमहालसारखं दिसणारं अलिशान घर बांधून घेतलं आहे. हे घर खऱ्या ताजमहालशी इतकं मिळतं- जुळतं आहे की क्षणभर हे घर आहे की ताजमहाल असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. हा ताजमहाल बघायला आता बरेच दुरून दुरून लोक येत आहेत आणि त्यांच्या प्रेमाची आणि या ताजमहालची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपल्या बायकोवर इतकं प्रेम करणारा हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण, अशी उत्सूकताही घर बघायला येणाऱ्या मंडळींना असते.
याविषयी आनंदप्रसाद चोकसे यांनी एक पाेस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यात ते म्हणतात की मुमताजचा मृत्यू बुरहाणपुर या शहरातच झाला. मग शहाजहानने ताजमहाल या शहरात का नाही बांधला, असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. त्यामुळे मग मीच पुढाकार घेतला आणि माझ्या पत्नीसाठी याच शहरात ताजमहाल बांधला.
ताजमहाल बांधायला लागली ३ वर्षेअगदीच ताजमहाल सारखा दिसणारा हा अलिशान बंगला बांधायला तब्बल ३ वर्षे लागली. हा बंगला तयार करणाऱ्या इंजिनियरने सांगितलं की ताजमहालसारखी हुबेहुब प्रतिकृती तयार करायला खूपच मेहनत घ्यावी लागली. हे काम खरोखरंच खूप अवघड होतं. हे घर बांधण्याआधी इंजिनियरने खऱ्या ताजमहालचा अभ्यास केला आणि त्यानंतर हे काम हातात घेतलं असंही सांगितलं जातं. हे घर बांधण्यासाठी खास बंगाल अणि इंदौर येथून कारागीर आणले गेले होते.
ही आहे ताजमहाल बंगल्याची खासियत.....हा बंगला अतिशय अलिशान असून यामध्ये ४ प्रशस्त बेडरूम आहेत. ताजमहालप्रमाणेच या घरालाही मोठे मोठे घुमट आहेत. घराचा जो मुख्य आणि मध्यभागी असलेला घुमट आहे तो तब्बल २९ फूट उंच आहे. घराची फरशी खास राजस्थान येथून मागविण्यात आली आहे तर फर्निचर तयार करायला मुंबई येथील कारागीरांना बोलविण्यात आले हाेते. घरात एक मोठा आणि प्रशस्त दिवाणखाना असून एक सुसज्ज ग्रंथालय आणि एक ध्यानकक्ष देखील आहे. या घराला अशा पद्धतीने लाईटींग करण्यात आली आहे की रात्रीच्या वेळी हा खराखुरा ताजमहाल आहे की ताजमहालची प्रतिकृती असा प्रश्न पाहणाऱ्याला नक्कीच पडतो. घराच्या भोवती ताजमहालप्रमाणेच बरीच झाडी लावण्यात आली आहेत.