शिक्षण पूर्ण झालं की नोकरी मिळवणं आणि उत्पन्नाचं साधन निर्माण होणं अतिशय गरजेची गोष्ट असते. काहींना नशिबाने किंवा त्यांच्या गुणवत्तेवर लगेचच नोकरी मिळते तर काहींना नोकरी मिळवण्यासाठी खूप झगडावे लागते. अनेकदा बरेच प्रयत्न करुन नोकरी मिळाली नाही तर ती व्यक्ती नैराश्यातही जाण्याची शक्यता असते. नुकतीच एका तरुणाला नोकरी मिळत नसल्याने त्याने एक अनोखी शक्कल लढवली. दुबईमध्ये एका व्यक्तीला ऑनलाईन अर्ज करुनही नोकरी न मिळाल्याने त्याने चक्क ट्रॅफिक सिग्नलवर आपला बायोडेटा वाटण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने या बायोडेटासोबत प्रत्येकाला एक चॉकलेटही भेट दिले (Man Do Such a Thing for Getting Job in Dubai Viral Photo).
या बायोडेटासोबत त्याने एक खास नोट जोडली होती. त्यामध्ये लिहीले होते, तुम्ही मला नोकरी मिळवायला मदत केलीत तर मी तुमचा आभारी राहीन. मी तुमच्याकडून प्रेमाची आणि माझ्या आयुष्यात आनंदाचा एक दिवस उगवेल याची वाट पाहतो आहे. या व्यक्तीने या नोटवर आपले नाव आणि संपर्क क्रमांक लिहून दिला आहे. जेणेकरुन कोणाला एखाद्या नोकरीबद्दल माहिती असेल तर ते त्याला संपर्क करु शकतील. नवर मौखलती असे या व्यक्तीचे नाव असून त्याने याआधी सेल्समन म्हणून नोकरी केली आहे. त्याला अरबी आणि इंग्रजी भाषा येत असल्याचेही त्याने आपल्या बायोडेटामध्ये नमूद केले आहे.
याबाबत मौखलती याने आपल्या लिंक्डइन अकाऊंटवरही पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटीझन्सनी त्याला लवकरात लवकर नोकरी मिळावी अशी आशा व्यक्त केली आहे. लोकांनी कमेंटच्या माध्यमातून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तुझी चांगली वेळ आली की तुला नक्की नोकरी मिळेल, प्रयत्न करणे सोडू नकोस असे म्हणत लोकांनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता नोकरीसाठी अशाप्रकारे प्रयोग करणाऱ्या या व्यक्तीला सिग्नलवर बायोडेटा वाटल्यानंतर तरी नोकरी मिळाली की नाही हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कोरोनानंतर बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना त्याचा फटका बसला आहे. हे त्याचेच एक उदाहरण असून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधरावी अशी आशा आहे.