लहान मुलं अवखळ आणि चंचल असतातच. कधी कधी रस्त्यावरून धावताना, सायकलिंग (cycling in a high speed) करताना त्यांना वेगाचं भान अजिबातच रहात नाही. कोणी आपल्या समोर अचानक आलं तर किंवा आपण कुणाला जाऊन धडकलो तर... असे विचार त्यांच्या बिंधास्त मनाला शिवतही नाहीत. त्यामुळे आपल्याच मनाच्या गतीवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगात धावणारे, सायकलिंग करणारे अनेक चिमुरडे आपण आपल्या आजुबाजुला बघत असतो. ही लहानशी पोरही तशीच.
सध्या सायकलिंग करणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. viralhog या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे, त्यावरून तर हा व्हिडिओ भारतातलाच आहे, असं वाटतं. या व्हिडिओमध्ये खूप काही वर्दळ नसणारा एक रस्ता दिसतो आहे. आणि रस्त्याच्या एका बाजूला दोन व्यक्ती बोलत आहेत. त्या व्यक्ती जिथे आहेत, त्यांच्या समोरूनही एक रस्ता येतो, असं वाटतं. अशातच भरधाव वेगात एक कार त्यांच्या बाजुच्या रस्त्यावरून सुसाट जाते. त्यानंतर काही सेकंदानंतर लगेचच त्यांच्या समोरच्या बाजूला जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरून एक अंदाजे ७ ते ८ वर्षाची मुलगी खूपच वेगात सायकल चालवत त्या दोघांच्याच दिशेने येते.
ती ज्या स्पीडने येते, त्यावरून हे तर पक्कं लक्षात येतं की तिचं सायकलवरच नियंत्रण पुर्णपणे सुटलेलं होतं आणि अगदी पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काहीही होऊ शकलं असतं. पण तिचा तो वेग पाहून त्या दोघांमधला एक जण वेळीच सावध झाला. ही सायकलस्वार मुलगी येऊन त्यांच्या बाजुच्या खांबाला धडकणार तोच तो वेगात तिच्या सायकलसमोर गेला आणि तिला त्याने वाचवलं. त्याने तिला पकडलं नसतं, तर प्रचंड वेगात आलेली ती चिमुरडी त्या खांबावर दणकन आपटली असती.
इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक
अवघ्या काही सेकंदात त्या व्यक्तीने जे काही प्रसंगावधान दाखवलं, त्यामुळे त्या मुलीसोबत होणारा मोठा अनर्थ टळला. मुलीला वाचवण्याच्या नादात त्या व्यक्तीच्या पायाला मात्र जोरात खांब लागला. या व्हिडिओला "Dad reflexes in action" असं कॅप्शन देण्यात आलंय. पण ती व्यक्ती त्या मुलीचे वडीलच असतील, असं काही वाटत नाही. वडील असो की अन्य कुणी व्यक्ती असो... पण त्या व्यक्तीमुळे, तिच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला हे मात्र नक्की.