Join us  

मंगळागौरीला जाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; भरपूर करा एन्जॉय- व्हा रिलॅक्स-करा मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 2:31 PM

Mangalagauri Pooja Khel Enjoyment : मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा तर...

मंगळागौर म्हणजे नव्याने लग्न झालेली सुवासिनीने करण्याची मंगळागौरीची पूजा. श्रावणातल्या मंगळवारी नव्याने लग्न झालेल्या वधू अतिशय भक्तीभावाने ही पूजा करताना दिसतात. नव्याने लग्न झालेल्या आजुबाजूच्या मुलीही या पुजेला आवर्जून येतात. पारंपरिक दागिने आणि वस्त्र घालून ही पूजा यथासांग पार पडते आणि मग गुरुजी वाळूची छानशी शंकराची पिंड तयार करतात. यांपिडीचीही पूजा केली जाते. मंगळागौरीच्या निमित्ताने लग्न झालेल्या मुली माहेरी येतात. त्यांच्या मैत्रीणींमध्ये, बहिणींमध्ये त्यांना वेळ घालवता यावा आणि लहानपण अनुभवता यावे हा यामागचा एक खास उद्देश असतो (Mangalagauri Pooja Khel Enjoyment). 

मंगळागौरीची रात्र जागपण्याचे कार्यक्रमही अगदी पूर्वापार चालत आले आहेत. आजकाल हॉलमध्ये किंवा एखाद्या कार्यालयात मंगळागौर असेल तर एखाद्या ग्रुपला बोलवून हे खेळाचे कार्यक्रम केले जातात. पण घरातील महिलांनी या खेळांचा आनंद घेणे महत्त्वाचे असते. मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात..

(Image : Google)

१. मनापासून खेळात सहभागी व्हा

आपल्या आजुबाजूला सतत काही ना काही नकारात्मक गोष्टी घडतच असतात. कामाचे ताण, इतर गोष्टींचे टेन्शन हे असले तरी हे सगळे काही काळासाठी बाजूला ठेवायला हवे. कोणीही आपल्याला खेळण्यासाठी बोलवण्याची वाट न पाहता मंगळागौरीच्या खेळांमध्ये आपण स्वत:हून सहभागी व्हायला हवे. यामुळे आपला ताण काही काळासाठी का दूर होण्यास मदत होते आणि आपण पुन्हा एकदा जुने दिवस आठवतो. 

२. साडीची निवड

साडी खूप भरजरी आणि जड न नेसता थोडी हलकी आणि अंगाला चोपून बसेल अशीच निवडावी. अनेकदा आपण साडी थोडी सैलसर नेसतो किंवा हातावर पदर घेतो. पण मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील तर साडी थोडी वरती नेसावी. तसेच पदर आणि निऱ्या योग्य पद्धतीने पिन अप केलेल्या असाव्यात. जेणेकरुन आपल्याला खेळ खेळताना साडीचा अडथळा होत नाही आणि आपण मनसोक्त खेळू शकतो. 

३. हेअरस्टाइल आणि दागिने 

दागिन्यांची निवड करताना शक्यतो मोत्याचे, हलकेफुलके आणि टोचणार नाहीत असे दागिने निवडावेत. फार जड, भारदस्त दागिन्यांची निवड केल्यास आपल्याला खेळताना ते लागू शकतात. तसेच हेअरस्टाइल करताना ती नीट चापून चोपून केलेली असावी. किंवा चक्क केस मोकळे सोडलेले असावेत. बांधायचेच असतील तर ते व्यवस्थित वरच्या बाजूला घट्ट बांधायला हवेत. 

(Image : Google)

४. तब्येत सांभाळा

अनेकदा आपल्याला अशाप्रकारचे खेळ खेळायची सवय राहिलेली नसते. त्यामुळे आपले अंग ठणकू शकते. अशावेळी अंगाला गरम पाण्याचा शेक घेणे, मसाज घेणे असे उपाय केल्यास फायदा मिळतो. तसेच खेळल्यानंतर दमल्याने खूप भूक लागली असेल तरी एकदम खूप खाऊ नका, जाईल तितके आणि पचेल तितकेच खा. ढसाढसा पाणी पिणे टाळा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलश्रावण स्पेशल