आलियाचे वेडिंग पिक्स जसे व्हायरल झाले तशी तिच्या पोशाखाची आणि दागदागिन्यांची चर्चा रंगू लागली. इतर कोणत्याही पारंपरिक नवरीपेक्षा आलियाचा लूक (wedding look of Alia) अतिशय वेगळा आणि खास होता. कदाचित त्यामुळेच तिच्या लूकची एवढी चर्चा रंगलेली आहे. साधारणपणे सेलिब्रिटी लग्नात लाल, मरून, गुलाबी अशा रंगाचे लेहेंगे घातले जातात. पण आलियाने मात्र गोल्डन रंगाची ऑर्गेंझा साडी नेसणेच पसंत केले.
पोशाखाप्रमाणेच आलियाची हेअर स्टाईल हा देखील चर्चेचा विषय ठरला होता. लग्नात बन घातलेली किंवा लांब वेणी किंवा एखादी हटके हेअरस्टाईल केलेली नवरी बघण्याची आपल्याला सवय असते. पण आलिया मात्र यालाही अपवाद ठरली. तिने लग्नासाठी केस मोकळे सोडले होते. ड्रेसिंग, हेअरस्टाईल यामध्ये जसा बटबटीतपणा, भडकपणा नव्हता तसाच तो तिच्या ज्वेलरीमध्येही दिसला नाही. आलियाचं मंगळसूत्र तर एवढं नाजूक होतं की तिच्या गळ्याभोवती असणाऱ्या मोठ्या नेकलेसमध्ये ते अक्षरश: शोधावं लागलं.
आलियाचं मंगळसूत्र सब्यासाची (Sabyasachi) कलेक्शनमधलं असून त्याचं डिझाईनही अतिशय सिंपल पण तेवढंच खास आहे. सोन्याची साखळी असावी, त्याप्रमाणे हे शॉर्ट मंगळसूत्र आहे. पेंडंटंच्या वरच्या भागात मंगळसुत्राच्या दोन्ही बाजूंना ४ ते ५ काळे मणी लावलेले आहेत. आलियाच्या मंगळसुत्राचं पेंडंट हेच खरं तर तिच्या मंगळसूत्राचं वैशिष्ट्य. या मंगळसुत्राचं पेंडंट म्हणजे गणितातलं 'इन्फिनिटी'चं चिन्ह आहे. म्हणजेच साधारणपणे इंग्रजीतले आडवे आठ असं त्याचं डिझाईन आहे. आणि त्याच्याखाली एक छोटासा डायमंड आहे.
आता या इन्फिनिटीच्या (sign of infinite) चिन्हावरूनही खूपच चर्चा रंगली आहे. तो इंग्रजीतला ८ हा आकडा असून तो रणबीरचा शुभ अंक आहे. त्यामुळे आलियाने असं डिझाईन निवडलं अशी चर्चा याबाबत रंगली आहे. तर काही जण असंही म्हणत आहेत की इन्फिनिटीचा अर्थ अमर्याद.. तसंच अमर्यादित प्रेम त्यांचं एकमेकांवर कायम रहावं, यासाठी त्यांनी या चिन्हाची निवड केली आहे.. आता आलियाच्या मंगळसुत्रातलं ते चिन्ह इन्फिनिटीचं आहे की ते खरोखरंच इंग्रजीतले आठ आहेत, याचं उत्तर त्यांचं त्यांनाच माहिती.. पण आलियाचं मंगळसूत्र खरोखरंच खास आहे, हे मात्र नक्की. हेच इन्फिनिटीचं चिन्ह आलियाच्या कलीरेमधेही दिसून आलं.