लग्न समारंभात लग्नाची पत्रिका म्हणजे केवळ लग्नाचं आमंत्रण देण्यापुरतीच नसते. लग्नातला थाटमाट दाखवण्याची प्रतिकात्मक संधी लग्नाच्या पत्रिकेतून साधली जाते. मोठ्या आकाराची, लग्नातल्या प्रत्येक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी अनेक पानांची पत्रिका काढण्याचा नवीनच ट्रेण्ड सध्या जोरात सुरु आहे. तर लग्नाची पत्रिकेद्वारे काहीजण आपल्या लिखाणाच्या कौशल्याचं प्रदर्शन करतात. कोणी आपल्या लग्नाच्या पत्रिकेत मोठ्याला कविता लिहितात तर कोणी सुविचारासारखे लग्नासंबंधीचे, नात्यासंबधीचे विचार लिहितात. अशा पत्रिका त्यातील अनोख्या संदेशामुळे व्हायरल होतात. सध्या अशीच एक पत्रिका त्यातील संदेशामुळे व्हायरल होत आहे.
Image: Google
केजीएफ या दाक्षिणात्य चित्रपटानं पहिल्या भागापासून प्रेक्षकांवर मोहिनी केली असून ही जादू केजीएफ2 प्रदर्शित झाला तरी टिकून आहे. केजीएफबद्दलचं आपलं प्रेम दाखवण्याची आणि मनातलं सांगण्याची संधी एका तरुणानं आपल्या लग्नाच्या पत्रिकेत साधली आहे. केजीएफ भाग एकमध्ये अभिनेता यशच्या तोंडी 'व्हायलन्स व्हायलन्स व्हायलन्स.. आय डोण्ट लाइक इट.. आय अव्हाॅइड इट.. बट व्हायलन्स लाइक मी, आय काण्ट अव्हाॅइड' हा गाजलेला डायलाॅग आहे. याच डायलाॅगच्या धर्तीवर तरुणानं लग्नाबद्दलचा डायलाॅग लिहून लग्नाबद्दलची मनातली खळबळही व्यक्त केली आहे. अनेक तरुण तरुणी स्वत:च्या लग्नाबद्दलचा निर्णय स्वत: घेत नाही. अनेकांना तर शिक्षण, नोकरी, करिअरच्या व्यापात लग्नच करावंसं वाटत नाही. पण इच्छा नसतानाही केवळ आई वडिलांच्या आग्रहाखातर अनेकजण लग्नासाठी तयार होतात. अनिच्छेने लग्न झाल्यास त्याचे परिणाम लग्नानंतरच्या नात्यावरही होतातच. म्हणूनच लग्नाच्या बाबत मुला मुलींच्या इच्छा अनिच्छांना, विचारांना, मतांना प्राधान्य द्या असं विवाह समुपदेशक सांगतात. पण तरीही घरातील जेष्ठांच्या आग्रहाखातर लग्नाला उभं राहाणाऱ्या तरुण तरुणींची संख्या बरीच आहे.
लग्नाबाबतीतल्य अनिच्छेनं मनात साठलेली खदखद कुठल्या ना कुठल्या प्रकारे बाहेर पडते. असंच कर्नाटकातल्या चंद्रशेखर नावाच्या तरुणानं अनिच्छेनं लग्न करण्याची खदखद व्हायलन्स व्हायलन्सच्या धर्तीवर रंजकपध्दतीनं व्यक्त केली आहे. चंद्रशेखरनं आपल्या पत्रिकेत मॅरेज मॅरेज मॅरेज, आय डोन्ट लाइक इट, आय अव्हाॅइड, बट माय रिलेटिव्हज लाइक मॅरेज, आय कान्ट अव्हाॅइड' असं म्हणत आपल्या नातेवाईकांच्या इच्छेमुळे आपण लन्ग करत असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.
चंद्रशेखरनं पत्रिकेवर लिहिलेला संदेश केजीएफ स्टाइल असल्यानं हसण्यावारी नेला आहे. चंद्रशेखरनं हे मजेनं लिहिलं आहे की गांभिर्यानं हे त्याचं त्यालाच माहिती. पण त्यानं लिहिलेल्या संदेशातून जसं रंजन होतं तसा एक गंभीर संदेशही व्यक्त होत आहे, याची त्याला जाणीव असेअलही किंवा नसेलही पण त्याची पत्रिका त्याने लिहिलेल्या संदेशानं व्हायरल होत आहे हे मात्र खरं.