फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता इन्स्टाग्रामवर खूपच प्रसिध्द आहे. एकतर तिचे स्वत: डिझाइन केलेले कपडे , तिच्या डोक्यावरच्या फॅशनेबल हॅटस यामुळे मसाबाचा एक वेगळा फॅनक्लब आहे. हा फॅनक्लब मसाबाच्या प्रत्येक पोस्ट आवडीने वाचतो. मसाबा ही फॅशन डिझायनर असली, तिच्या फॅशनेबल स्टाइलबद्दल प्रसिध्द असली तरी ती खाण्याच्या बाबतीत फारच साधीसुधी अहे. जेवणाला साधे आणि पारंपरिक पदार्थ, आई करत असलेले पदार्थ हे तिचे आवडीचे पदार्थ आहे. जेवणाच्या ताटात साधेपणा जपणार्या मसाबानं इन्स्टाग्रामवर शनिवारची पौष्टिक सुरुवात एक वाटी साबुदाण्याची खिचडी म्हणत साबुदाण्याच्या खिचडीचा फोटो पोस्ट केला आहे. मसाबानं साबुदाण्याच्या खिचडीचा ‘ बेस्ट ब्रेकफास्ट’ म्हणून उल्लेख केला आहे. त्याचा खूप जणांना आनंद झाला आहे. कारण साबुदाण्याची खिचडी हा अनेक खवय्यांचा आवडीचा मेन्यू आहे.
Image: Google
साबुदाण्याच्या खिचडीसारखे साधे पदार्थ मसाबाच्या फेव्हरिट फूडच्या यादीत आहे. घरगुती, उत्तम चवीचे आणि पौष्टिक पदार्थ खाण्याला आणि बनवण्याला मसाबा प्राधान्य देते. पदार्थ चविष्ट करण्यासाठी काय करायचं याबद्दलचं मसाबाचं ज्ञान आई नीना गुप्तापेक्षाही जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच मसाबानं इन्स्टाग्रामवर रव्याच्या आप्प्यांचा फोटो शेअर केला होता. यात तिनं ही पाककृती आपण आपल्या आईकडून शिकलो असल्याचं म्हटलं आहे. आपल्या आईकडून वेगवेगळ्या पाककृती शिकण्याची मसाबाला आवड आहे. स्वत: नीना गुप्ता देखील म्हणतात की, ‘ जर तुम्हाला पौष्टिक खाण्याची इच्छा आहे तर आईला फोन लावा, आईला विचारा. प्रामुख्याने हाच उत्तम पर्याय ठरेल आणि आईने सांगितलेल्या पाककृती या खर्चिक देखील नसतात हे विशेष.
Image: Google
मसाबा केवळ पदार्थांचे फोटो टाकून लक्ष वेधत नाही. विशेषत: पौष्टिक पदार्थांचे ती जेव्हा फोटो टाकते तेव्हा त्या पदार्थामध्ये कोण कोणत्या सामग्रीचा समावेश केला आहे हे देखील विस्तारानं सांगते. मागे तिने चविष्ट आणि पौष्टिक रॅप रोलचा फोटो टाकला होता. हा रॅप रोल तिने पालकाचा केला होता. त्यात तिने जवस, चिया सिडस, लेट्यूसची कुरकुरीत ताजी पानं या पौष्टिक घटकांचा समावेश केला होता. तसेच तो चमचमीत करण्यासाठी हॉट सॉस वापरलं होतं.
घरात मेजवानी असेल, कोणाला ट्रीट द्यायची असेल तरी देखील मसाबा आपली पारंपरिक पदार्थांची आवड जोपासते. एकदा पार्टीच्या मेन्यूसाठी तिने केरळमधील पारंपरिक साधे पदार्थ शोधले आणि ते मेजवानीला ठेवले. यात केरळमधील प्रसिध्द असे अविअल, नागली नूल पिट्टू, कच्च्या आंब्याची करी हे पदार्थ तिने केळीच्या पानावर वाढले होते. हे पदार्थ देखील तिच्या अनेक विकेण्ड स्पेशल मेन्यूमधले विशेष पदार्थ आहेत
Image: Google
फॅशन म्हणजे आधुनिकता, जुनं टाकून एकदम नवीन अशा दृष्टिकोनातून फॅशनकडे, फॅशन निगडित व्यक्तिमत्त्वांकडे पाहिलं जातं. पण फॅशन डिझायनर असलेल्या मसाबाच्या स्वयंपाकघरात मात्र शिजतात ते अगदी साधे, घरगुती पदार्थ हे पाहून सोशल मीडियावर मसाबाचं कौतुकही होतं आहे आणि इतकी कशी मसाबा साधी म्हणून आश्चर्य देखील व्यक्त होत आहे.