अमेरिकेतल्या क्रिस्टन ग्रे विल्यम्सनं वयाच्या 39 व्या वर्षी एक प्रवास सुरु केला. हा प्रवास होता कुटुंब विस्तारण्याचा.. एक मोठं कुटुंब असण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा. आज क्रिस्टन 51 वर्षांची आहे आणि ती 5 मुलींची आई आहे. आपल्या मुलींना वाढवण्यात, त्यांना हवं नको ते बघण्यात, त्यांच्याशी खेळण्यात मस्ती करण्यात, त्यांची भांडणं सोडवण्यात आज क्रिस्टनचा दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो हे तिचं तिलाच कळत नाही.
Image: Google
क्रिस्टन पेशानं शिक्षिका. तिला आपलं मोठं कुटुंब हवं असं खूप वाटायचं. लग्न करण्यासाठी तिनं जोडीदार शोधण्याचा बराच प्रयत्न केला. पण तिला योग्य जोडीदारच मिळेना. क्रिस्टनला वाटायला लागलं की लग्नापेक्षा सिंगल राहिलेलंच बरं. तिला सिंगल राहायचं होतं पण एकटं नाही. आई होण्याची तिची इच्छा तीव्र होती. क्रिस्टलनं मूल दत्तक घेण्याचं ठरवलं. किस्टल एकटी असल्याकारणानं तिला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकट्या स्त्रीला दत्तक मूल घेता येणं अमेरिकेत अशक्य वाटायला लागल्यावर तिनं दत्तक मुलासाठी बाहेरील देशात अर्ज करायचं ठरवलं. तिनं नेपाळमध्ये अर्ज केला. त्यासाठी तिनं अठ्ठावीस हजार डाॅलर्स मोजले. पण अमेरिकन प्रशासनानं नेपाळमधून मूल दत्तक घेण्याचा तिचा अर्ज फेटाळून लावला. यामुळे आपलं मूल दत्तक घेण्याचं स्वप्न सहजासहजी पूर्ण होणार नाही याची जाणीव क्रिस्टनला झाली . पण एके दिवशी तिला भारतातील संस्थेचा फोनआला. तिचा भारतातून मूल दत्तक घेण्याचा अर्ज स्वीकारण्यात आला होता. पण तिला वर्तन समस्या असलेलं मूल दत्तक मिळणार होतं. पण क्रिस्टननं हे आव्हान आनंदानं स्वीकारलं. तिनं 5 वर्षांच्या मुन्नीला दत्तक घेतलं. मुन्नीच्या आधीच्या पालकांनी तिचं शोषण केलेलं होतं. त्याचा परिणाम तिच्या मनावर झालेला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रणं देखील होते. पण किस्टनला सगळ्यात आश्वासक वाटलं ते मुन्नीच्या चेहऱ्यावरचं आश्वासक हसू.
Image: Google
मुन्नीला दत्तक घेताना क्रिस्टनचे वडील आनंदी नव्हते. यामुळे खरंतर क्रिस्टन दुखी झाली होती. पण तिच्या बाबांनी मुन्नीला घेताना संस्थेला पैसे देताना क्रिस्टनची नुसतीच आर्थिक मदत केली नाही तर मुन्नीच्या नावापुढे ग्रे हे त्यांच्या कुटुंबाचं नावही लावलं. मुन्नी ग्रे कुटुंबाची सदस्य झाली. 2013 मध्ये 5 वर्षांची मुन्नी क्रिस्टनच्या घरी राहायला आली. काही दिवसानंतर क्रिस्टनला मुन्नीला कोणातरी भाऊ बहिण असावं असं वाटायला लागलं. तिनं दुसरं मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला. 22 महिन्यांची रुपा तिनं दत्तक घेतली. रुपा ही सुदृढ होती. पण तिला नाक नव्हतं. तिला जन्मत:च रस्त्यावर टाकून दिलं होतं. कुत्र्यानं तिचं नाक खाल्लं होतं. क्रिस्टननं रुपाला दत्तक घेण्याचं ठरवलं. त्याच्या पुढच्या दोनच वर्षात क्रिस्टननं मोहिनी आणि सोनाली या आणखी दोन मुलींना दत्तक घेतलं. 2020मध्ये क्रिस्टननं डाऊन सिंड्रोम ही समस्या असलेल्या स्निग्धाला दत्तक घेतलं. आता क्रिस्टनला आपलं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं.
Image: Google
आपल्या 5 मुलींना वाढवण्यासाठी तिला शिक्षिकेचा पगार अपुरा पडू लागला. त्यामुळे तिनं रिअल इस्टेट क्षेत्रातही कामाला सुरुवात केली. पण सध्या तिनं मुलींकडे व्यवस्थित लक्षं देता यावं यासाठी वर्क फ्राॅम होमचा पर्याय स्वीकारला आहे. किस्टन म्हणते की, मी माझ्या मुलींना महत्वाची गोष्ट सांगितली आहे. तुमच्या आयुष्यात माणसं येतील जातील पण तुमचं एकमेकींशी बहिण म्हणून असलेलं नातं महत्वाचं. क्रिस्टन म्हणते आमचा प्रत्येक दिवस आनंदानं गजबजलेला असतो. आम्ही छोट्यातली छोटी गोष्टही साजरी करतो. सोनालीचा दात पडला तेव्हा आपण सगळ्यांनी आइस्क्रीम पार्टी केल्याचं क्रिस्टन सांगते. क्रिस्टनला आई झाल्याचा जेवढा आनंद आहे तितकंच मुलींना त्यांच्या हक्काचं घर आणि हक्काचं माणूस मिळाल्याचं जास्त समाधान आहे. एकट्यानं मुलींना वाढवणं हे तिला आव्हानात्मक वाटत असलं तरी मुलींना प्रेम आणि स्थैर्य देण्यासाठी आपण वाटेल ते कष्ट करु असं क्रिस्टन सांगते तेव्हा कोणीही त्यावर एक आईच असा विचार करु शकते अशी प्रतिक्रिया सहज देईल.