खाण्याच्या बाबतीत लोक काय प्रयोग करतील सांगता येत नाही. कधी आमरस डोसा तर कधी चॉकलेट मॅगी, कधी गुलाबजाम सामोसा तर कधी आणखी काही. नवीन काहीतरी करायचे म्हणून लोक काय वाट्टेल ते प्रयोग करतात आणि मग सोशल मीडियावर या पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट झाले की नेटीझन्स त्यावर प्रतिक्रिया देत राहतात. नुकताच असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मिसळ आणि इडली असे विचित्र कॉम्बिनेशन केलेले दिसत आहे. मिसळ हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अतिशय आवडीचा पदार्थ. चमचमीत तोंडाला चव आणणारी ही मिसळ महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कडधान्य, चिवडा, कांदा, फरसाण आणि सगळ्यात महत्त्वाची तर्री अशी ही मिसळ पाव किंवा ब्रेड यांच्यासोबत खाल्ली जाते (Misal Idli Viral Photo Social Media).
मिसळ आणि पाव हे जगभरात प्रसिद्ध असणारे खास महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन आहे. पण एका महिलेने ट्विटर अकाऊंटवर मिसळचा फोटो शेअर करत त्यासोबत इडली जास्त चांगली लागत असल्याचे म्हटले आहे. इडली हा साऊथ इंडीयन पदार्थ असून तो चटणी, सांबार, तूप यांच्यासोबत खाल्ला जातो. पण इथे या महिलेने चक्क मिसळीसोबत इडली चांगली लागत असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे खाद्यपदार्थांचे बरेच प्रयोग केले जातात. पण या विचित्र कॉम्बिनेशनमुळे तिच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत.
मिसळप्रेमींना या कॉम्बिनेशनचा काहीसा राग आला असून मिसळसोबत ब्रेड किंवा पाव खायचा सोडून इडली कोण खातं असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. अदिती नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या ताटात २ इडल्या, एका बाऊलमध्ये मिसळ बाजूला फरसाण आणि लिंबू दिसत आहे. यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं अशा काही संतापजनक प्रतिक्रिया नेटीझन्सनी यावर व्यक्त केल्या आहेत. काहीही करता येतं म्हणून ते करायचं असं नाही असंही एकाने म्हटले आहे. तर एकाने आणखी काय काय पाहायला लावणार आहेत असं म्हणत अशाप्रकारच्या प्रयोगांबद्दल नाराजी दर्शवली आहे. आमच्या देशातून चालती हो, हा इडली आणि मिसळ या दोन्ही पदार्थांचा अपमान आहे असेही एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दोन्ही पदार्थांची अशा पद्धतीने वाट लावल्यामुळे राग आल्याशिवाय राहणार नाही.