मध्यप्रदेशातल्या जबलबूर जिल्ह्यातील एका आंबा उत्पादकानं आपली आंब्याची बाग राखण्यासाठी 3 सुरक्षारक्षक आणि वाॅच डाॅग प्रकारतल्या श्वानांची व्यवस्था केली अशी बातमी माध्यमात प्रसिध्द झाली. ही बातमी प्रसिध्द झाल्याबरोबर असा कुठला आंबा पिकवतो हा माणूस की ज्यासाठी एवढी सुरक्षा नेमावी लागली त्याला असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या आंब्याला प्रति किलो 3 लाख रुपये भाव मिळतो (worlds expensive mango)असा आंबा ज्या बागेत असेल त्या बागेभोवती एवढी सुरक्षा असणारच. या आंब्याचं नाव आहे मियाझाकी.
Image: Google
मियाझाकी (miyazaki mango) हा साधासुधा आंबा नाही. या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यापेक्षाही जास्त भाव आहे. हा आंबा जपानमधील मियाझाकी या शहरात 1984 मध्ये प्रथम पिकवला गेला म्हणून या आंब्याला मियाझाकी हे नाव पडलं. या प्रकारच्या आंब्याला भरपूर पाऊस आणि दीर्घकाळ सूर्यप्रकाश असं वातावरण आवश्यक असतं. जपान सोबतच हा आंबा बांग्लादेश, इंडोनेशिया, फिलिपाइन्स या उष्ण कटिबंधीय देशात होतो. लाल जर्द रंगाच्या या आंब्याचं शास्त्रीय नाव 'टाइयो नो टमैंग" असून त्याच्या लाल जर्द रंगामुळे याला 'एग्ज ऑफ सन' असंही म्हटलं जातं. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान या आंब्याचं उत्पादन होतं. मियाझाकी या आंब्यात ॲण्टिऑक्सिडण्टस, बेटा केरोटीन, फोलिक ॲसिड हे गुणधर्म असतात. हा आंबा दृष्टी सुधारण्यास फायदेशीर असतो. एका साधारण आकाराचा आंबा 350 ग्रॅम ते 900 ग्रॅम वजनाचा असतो. या आंब्याचा भाव वजनाप्रमाणे 8,600 रुपयांपासून 2-3 लाख रुपयांपर्यंत असतो. या आंब्यात नेहमीच्या आंब्यापेक्षा 15 टक्के जास्त साखर असते. हा आंबा सालीसकट खाता येईल इतकी त्याची साल पातळ असते.
Image: Google
भारतात मियाझाकी या प्रकारचा आंबा पिकवण्याचा प्रयोग काहीजण करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील संकल्प परिहार आणि राणी परिहार हे जोडपं. गेल्या दोन वर्षांपासून मियाझाकी हा आंबा भारतात पिकवणारे अशी त्यांची ओळख झाली आहे. आणि सध्या ते चर्चेत आहे ते त्यांनी आंब्याच्या बागेसाठी नेमलेल्या सुरक्षेमुळे. एवढा महागाचा आंबा चोरीला जात असल्याचं लक्षात आल्यानं परिहार यांनी आपल्या मियाझाकी आंब्याच्या बागेच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षारक्षक आणि 9 श्वानांची नेमणूक केली आहे.
संकल्प परिहार हे आता नेटानं मियाझाकी आंब्याचं उत्पादन घेत असले तरी याची सुरुवात मात्र उत्सुकता आणि कुतुहलापोटी झालेली होती. एकदा संकल्प परिहार केरळमध्ये हायब्रिड नारळाची रोपं घेण्यासाठी निघाले होते. त्यांनी रेल्वेचं एसी डब्याचं तिकिट काढलं होतं. पण ते तिकिट कन्फर्म झालेलं नसल्यानं त्यांना फर्स्ट क्लासमधून प्रवास करावा लागला. या प्रवासात त्यांंची ओळख मियाझाकी या आंब्याच्या रोपाच्या विक्रेत्याशी झाली. त्याने या प्रकारच्या आंब्याला लाल, काळा, जांभळा अशा रंगाचा आंबा येतो हे सांगितलं. परिहार यांना त्याबाबत कुतुहल वाटलं. आपणही आंब्याची ही रोपं लावून पाहावी असं वाटलं. त्यांनी अडीच लाख रुपयात 100 कलमं विकत घेतली. त्या 100 पैकी 52 रोपं जगली.
Image: Google
परिहार यांच्या एका आंब्याला 21 हजार रुपये भाव मिळाला होता तरी त्यांनी तो विकला नव्हता. परिहार यांचा उद्देश सध्या मियाझाकी हा आंबा विकणं नसून त्यांना आंब्याची ही बाग आणखी वाढवायची आहे. त्यांना येत्या काही वर्षात 400-500 मियाझाकी आंब्याची रोपं लावायची आहे. मियाझाकी हा आंबा भारतात फारच कमी प्रमाणात आढळत असला तरी परिहार यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोगामुळे मियाझाकी आंबा बघायला आणि चाखायला मिळेल अशी आशा लोकांना वाटते आहे.