सध्या सोशल मीडियावर एकूणच सगळीकडे पॅरिस फॅशन विकचे (Paris Fashion Week) वारे वाहत आहेत. सोशल मीडियावर आपण दररोज या पॅरिस फॅशन विकमधील मॉडेल्सनी घातलेले चित्र - विचित्र कपडे, अनोखी फॅशन, त्यांचे व्हायरल व्हिडीओ पाहत असतोच. हे व्हायरल व्हिडीओ, फोटोज बघून नेटकरी सोशल मिडीयावर त्यांच्या कपड्यांची किंवा इतर गोष्टींची चर्चा कायम करत असतात. सध्या असाच एक पॅरिस फॅशन विकमधील (Paris Fashion Week) मॉडेलने घातलेल्या अजब - गजब ड्रेसचा आणि त्या ड्रेसमुळे तिची झालेली बिकट अवस्था याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे(Model Dressed As Giant Furball Turns "Wrecking Ball" In A Mishap At Paris Fashion Week For Christian Cowan's Show).
पॅरिस फॅशन वीक (Paris Fashion Week) असो किंवा कोणताही फॅशन शो असो त्यातील एक किंवा अधिक किस्से व्हायरल झाल्याशिवाय रहात नाही. आपण आत्तापर्यंत सोशल मिडीयावर अनेक अशा शोज मधील व्हायरल झालेले प्रसंग पहिलेच असतील. कधी मोठे हिल्स घालून चालता न आल्यामुळे, कधी ड्रेस फारच पायघोळ असल्यामुळे, तर कधी हेअरस्टाईल किंवा अशा अनेक कारणांमुळे मॉडेल्सची रॅम्पवर चालताना पंचाईत होते. अशीच काहीशी बिकट परिस्थिती या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधील मॉडेलवर आली आहे. तिने परिधान केलेले कपडेच इतके भयंकर आणि अवाढव्य होते की रॅम्पवर चालताना तिच्या नक्कीच नाकीनऊ आले असतील. पाहुयात नक्की या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय घडले आहे ? (Paris Fashion Week 2023: Model Dressed As Furball Gets Lost on Runway, Hilarious Video Goes Viral).
रॅम्पवॉक करताना मॉडेल अशी गडबडली की...
ख्रिश्चन कोवानने (Christian Cowan) पॅरिस फॅशन वीकमध्ये त्याचे स्प्रिंग समर २०२४ कलेक्शन (Christian Cowan's Ready To Wear Spring Summer 2024) प्रदर्शित केले. या स्प्रिंग समर कलेक्शन मधील एका आगळ्या - वेगळ्या ड्रेसची सध्या खूपच चर्चा होताना दिसत आहे. ख्रिश्चन कोवान या डिझायनरने आपल्या एका मॉडेलला काळ्या रंगाचा फरच्या कापडापासून तयार केलेला एक मोठा बॉल कपडे म्हणून परिधान करण्यास दिला होता. फरच्या एका महाकाय काळ्या बॉलचा वेश परिधान केलेल्या मॉडेलच्या रॅम्पवॉकमुळे शो थांबविण्याची परिस्थिती येऊ शकली असती. परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्या मॉडेलला सावरुन घेत तिला योग्य ते मार्गदर्शन करत तिच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचण्यास मदत केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्याच झालं असं की, या मॉडेलने आपल्या डोक्यापासून पायापर्यंत एका महाकाय फरच्या कापडापासून बनलेल्या काळ्या बॉलचा वेश परिधान केला होता. या संपूर्ण वेशात ती अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत झाकोळून गेली होती. तिला चालताना डोळ्यासमोरचे काहीच दिसत नव्हते, यासोबतच स्टेजवर देखील फारशा लाईट्स नसल्यामुळे प्रकाश सुद्धा तुलनेन कमीच होता.
ती सध्या काय करते ? काही सेकंदात पास्ता खाते ! तिचे खाणे इतके फास्ट, नाव थेट गिनिज बुकात...
चक्क रॅम्पवॉक करताना डोळ्यासमोरचे काहीच दिसत नसल्यामुळे ही मॉडेल पुरती गडबडली होती, व वाट मिळेल तिथे चालत होती. एवढेच नव्हे तर त्यानंतर, गायक सॅम स्मिथ आपले गाणे सादर करत असलेल्या व्यासपीठावर देखील त्यांची टक्कर झालेली पहायला मिळते. योग्य वाट दिसत नसल्यामुळे ती मॉडेल इतकी बिथरली होती की ती चक्क रॅम्पवर हरवल्यासारखी वाटत होती. एवढेच करून ही मॉडेल थांबली नाही तर फॅशन शो बघण्यासाठी उपस्थित असलेल्या पहिल्या रांगेतील प्रेक्षकांच्या अंगावर जाऊन कोसळली. त्यानंतर इतर लोकांच्या मार्गदर्शनामुळे व स्टेजवरील लोकांच्या मदतीमुळे ती तिच्या शेवटच्या स्थानांवर कशीबशी पोहोचल्याचे पहायला मिळत आहे.
नेटकरी म्हणतात...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केलेल्या दिसत आहे. एक नेटकाऱ्याने म्हटले आहे की, हा ड्रेस नेमका कुठे विकत मिळतो? तर दुसऱ्या नेटकऱ्यांने, बिचारी... तिला श्वास कसा घ्यायला जमेल ? असा प्रश्न केला आहे. या मॉडेलचे धाडस पाहून मला हार्ट अॅटॅकच येईल अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी खूप हसले आहेत तर काहींना त्या मॉडेलची बिकट परिस्थिती पाहून तिची दया आली असलयाचे पाहायला मिळत आहे.