Join us  

शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 7:27 PM

अमेरिकेत (USA) शाळांमध्ये, शाळांच्या आवारात वाढणाऱ्या स्वैर गोळीबाराच्या (shooting in school) घटनांचा धसका पालकांनी घेतला आहे. सध्या व्हायरल होत असलेला 'माॅम व्हिल फाइंड यू' हा व्हिडीओ पालकांच्या मनातली हीच दहशत व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला शाळेत समजा गोळीबार झाला तर तू काय करशील याचं प्रशिक्षण देत असल्याचं दिसतं. 

नुकत्याच शाळेत जाणाऱ्या मुलाला आई काय शिकवेल? अर्थातच बडबड गीते, बाराखडी, पाढे शिकवेल, गोष्टी सांगेल. आपल्याकडे तरी पालक मुलांना असंच शिकवतात. पण तिकडे अमेरिकेतलं चित्रं मात्र वेगळं आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एका आई आणि मुलाचा व्हिडिओ (mom will find you)  तिकडे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आई- वडील एका वेगळ्याच दहशतीखाली वावरत असल्याचं दाखवतो. ही दहशत आहे शाळेत होणाऱ्या (shooting in school)  स्वैर गोळीबाराची. 

Image: Google

अमेरिकेत बंदूक बाळगण्याचं स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होत असल्याचं चित्रं सध्या अमेरिकेत दिसत आहे.  तेथील शाळांमध्ये, शाळांच्या आवारात वाढणाऱ्या स्वैर गोळीबाराच्या घटनांचा धसका पालकांनी घेतला आहे. सध्या व्हायरल होत असलेला 'माॅम व्हिल फाइंड यू' हा व्हिडीओ पालकांच्या मनातली हीच दहशत व्यक्त करत आहे. पालक या दहशतीपोटी काय करत आहे हे बघून पाहाणाऱ्याच्या मनालाही अमेरिकेतल्या पालकांच्या मनातल्या भीतीचा, काळजीचा स्पर्श झाल्याशिवाय राहात नाही. 

Image: Google

अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे राहाणाऱ्या कॅसी व्हाॅल्टन या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कॅसी आपल्या 5 वर्षाच्या मुलाला वेस्टनला शाळेत समजा गोळीबार झाला तर तू काय करशील? हे शिकवत आहे. कॅसी अमेरिकेतल्या त्या प्रत्येक आई वडिलांचं प्रतिनिधित्व करते ज्यांची मुलं शाळेत जात आहेत. कॅसीने 'इंडिपेंडण्ट ' या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत  अमेरिकेतल्या प्रत्येक पालकाच्या मनात असलेल भीती बोलून दाखवली आहे. कॅसी म्हणते  24 मेला टेक्सास येथील युवाल्डे शाळेत झालेला गोळीबार असेल किंवा नुकताच 4 जुलैला इलिनाॅइस येथील हायलॅण्ड पार्कमध्ये झालेला गोळीबार असेल हे सर्व आमच्या जवळ, आसपास घडत आहे. हे उद्या आमच्या मुलांच्या बाबतीतही घडू शकतं. त्यासाठी आमची मुलं तयार असायला हवी. त्यामुळेच मी माझ्या मुलाला गोळीबार झाल्यास स्वत:चा जीव वाचवता यावा यासाठी स्वसंरक्षणाचे धडे देत आहे.

 लहानपणी आपल्यालाही पालकांनी स्वसंरक्षणाचे धडे शिकवलेच होते, आता मी माझ्या मुलाला ALICE चा सिध्दांत ( ॲलर्ट, लाॅकडऊन, इन्फर्म, काउंटर, इव्हॅक्युएट अर्थात सजग होणं, स्वत:ला सुरक्षित जागी लपवणं, दुसऱ्यांना माहिती देणं, विरोध करणं आणि ती जागा सोडून पळून जाणं)  शिकवते आहे.

Image: Google

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत कॅसी आपल्या 5 वर्षाच्या वेस्टनला गोळीबार झाल्यावर काय करायचं याचं बारकाईनं प्रशिक्षण देताना दिसतेय. शाळेत गोळीबार झाल्याचं शिक्षकांनी सांगितलं तर काय करणार? वर्गात एखाद्या कोपऱ्यात कसं लपायचं, स्वत:कडे असलेल्या बुलेटप्रूफ स्कूल बॅगचा स्वसंरक्षणासाठी कसा वापर करायचा, वर्गात शूटर असला आणि वर्गाबाहेर पोलिस असले तर कसं शांत राहायचं आणि संधी मिळताच तिथून कसं निसटायचं हे सर्व मुद्दे कॅसी बारकाईनं शिकवत असल्याचं आणि 5 वर्षांचा वेस्टनही मन लावून शिकत असल्याचं, आई जे सांगतेय ते नीट समजून घेत असल्याचं या व्हिडीओतून दिसतं. सोशल मीडियावर कॅसीचा व्हिडीओ व्हायरल झालेला असला तरी अमेरिकेतली पालक आपल्या मुलांना स्वसंरक्षणाचे असेच धडे देत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलशाळागोळीबारअमेरिका