भारतातील प्रत्येक राज्यात होळी साजरी करण्याची वेगळी पद्धत असते, परंतु आंध्र प्रदेशातील एका गावात साजरी होणारी होळी सर्वात अनोखी मानली जाते. येथे पुरुष साड्या नेसून आणि महिलांसारखे कपडे घालून होळी खेळतात. या परंपरेमागील कारण समजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
महिलांचे कपडे का घालतात पुरुष?
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील अदोनी मंडळातील संथेकुडलूर गावात ही अनोखी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी गावातील पुरुष महिलांप्रमाणे साड्या परिधान करून उत्सवात सहभागी होतात. असं केल्याने गावात सुख, शांती आणि समृद्धी राहते अशी यामागील श्रद्धा आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, ही परंपरा देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि वाईट शक्तींना दूर करण्यासाठी केली जाते. परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे आणि तिचं पालन करणं हे सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं.
शेकडो लोक खास परंपरा पाहण्यासाठी येतात
दरवर्षी, केवळ स्थानिक लोकच नाही तर दूरदूरच्या ठिकाणांहून शेकडो लोक ही खास परंपरा पाहण्यासाठी गावात येतात. पुरुष फक्त साड्याच घालत नाहीत तर ते महिलांसारखे दागिने आणि मेकअप देखील करतात. होळीच्या दिवशी संपूर्ण गाव ढोल-ताशांच्या गजरात सण साजरा करतं. महिलांचे कपडे घालणारे, नाचणारे आणि गाणारे पुरुष लक्ष वेधून घेतात.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या अनोख्या परंपरेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटतं आणि बरेच लोक याला भारताच्या विविध संस्कृतीचं एक अद्भुत उदाहरण मानत आहेत. 'भारतातील सणांच्या परंपरा किती अनोख्या आणि सुंदर आहेत' असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने 'ही परंपरा खरोखर पाहण्यासारखी आहे, जी भारतीय संस्कृती दर्शवते' असं म्हटलं. इतर ठिकाणी लोक पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करतात, तर संथेकुडलूर गाव त्याच्या अनोख्या परंपरेमुळे देशभर चर्चेचा विषय बनलं आहे.