Join us  

Mothers Day 2022 : 'काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हाही तुझी सोबत ..' स्मृती इराणींची आईसाठी इमोशनल पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2022 12:05 PM

Mothers Day 2022 : महिन्याला घरभाडं द्यायची भ्रांत असताना ती कधीच डगमगली नाही, स्मृती इराणी सांगतात आईच्या धाडसाची गोष्ट...

ठळक मुद्देस्मृतीजींना या पोस्टवर मातृदिनाच्या शुभेच्छा देऊन त्याच्याप्रती असलेली आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. हरणे हा कधीच पर्याय नसल्याने उठायचे आणि पुढे जात राहायचे ही तुझी शिकवण कायम लक्षात राहण्याजोगी आहे.

आपल्या प्रत्येकाची आई जन्मापासून कदाचित आपल्या जन्माच्या आधीपासूनच आपल्यासाठी किती खस्ता खात असते हे आपल्याला माहित आहे. आईचे ऋण आपल्यापैकी कोणीच या जन्मात फे़डू शकत नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपणारी आपली आई आपल्याला काय हवं नको ते बघतेच पण आपले खाण्यापिण्याचे, आवडीनिवडींचे सगळे लाड पुरवत असते. त्यामुळे आईने मुलांसाठी केलेल्या त्यागाचे कौतुक म्हणून आज जगभरात मातृदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आज सोशल मीडियावर आईला देण्यात येणाऱ्या शुभेच्छांचा पाऊस पडला आहे (Mothers Day 2022). अनेकांनी व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया हँडल्सवर आपले आईसोबतचे खास फोटो शेअर करत आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रिय मंत्री स्मृती इराणीही यामध्ये मागे नाहीत. 

(Image : Google)

सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असणाऱ्या स्मृती इराणी यांनी आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत आईने आपल्यासाठी खाल्लेल्या खस्तांविषयी अगदी मोकळेपणाने लिहीले आहे. त्या म्हणतात, तुझ्यासाठी काहीच सोपे नव्हते, पण जेव्हाही आयुष्यात आव्हाने आली तेव्हा त्यांच्याशी लढायचे ही एकच गोष्ट तू सातत्याने करत राहिलीस. पुढच्या महिन्याला घराचे भाडे कसे भरायचे असा प्रश्न अनेकवेळा समोर असायचा. त्यावेळीही तू कधीच पॅनिक झालेली मी पाहिले नाही. इतकेच नाही तर परिस्थितीबद्दल तू कधीही नशिबाला दोष दिल्याचेही माझ्या पाहण्यात आले नाही. पुढे त्या म्हणतात, आज इन्स्टाग्रामवर हे लिहीणे सोपे वाटत असले तरी तेव्हा तुझ्यासाठी हे नक्कीच सोपे नव्हते, मात्र तरीही तू कायम हसतमुख असायचीस. 

हरणे हा कधीच पर्याय नसल्याने उठायचे आणि पुढे जात राहायचे ही तुझी शिकवण कायम लक्षात राहण्याजोगी आहे. आयुष्यात काहीच नव्हतं तेव्हा तुझी सोबत कायम होती असे सांगणाऱ्या या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईचे २ फोटोही शेअर केले आहेत. आईला शुभेच्छा देताना स्मृतीजी तमात मातावर्गालाही शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत. इन्स्टाग्रामवर त्यांना बरेच फॉलोअर्स असून एका तासात त्यांच्या पोस्टला ४.५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी स्मृतीजींना या पोस्टवर मातृदिनाच्या शुभेच्छा देऊन त्याच्याप्रती असलेली आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्मृती इराणीमदर्स डे