तरुण मुलं किंवा मुलीही अनेकदा वेगवेगळे स्टंट करताना दिसतात. चालत्या बाईकवर स्टंट करण्याची तर त्यांच्यात स्पर्धा लागलेली असते. कधी ते बाईक सुरू असताना त्यावर उभे राहतात तर कधी हात सोडून, खाली डोकं वर पाय करुन रस्त्याने किंवा एखाद्या पूलावरुन बाईक चालवताना आपण व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये पाहतो. काही वेळा असे करणे काही तरुणांच्या जीवावर बेतणारेही ठरल्याच्या बातम्याही आपण वाचतो. काही जणांना तर गाडी अतिशय वेगाने चालवायला आवडते अशावेळी मधे खड्डा आला किंवा अगदी स्पीड ब्रेकर आला तरी त्यांना त्याचे भान राहत नाही. अशावेळी जे काही होते ते अनेकदा हास्यास्पद किंवा कधी गंभीर असते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाईकवर स्पीडमध्ये येणारे तरुण-तरुणी दिसतात. स्पीडमुळे त्यांच्यासोबत काय होते हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही (Motorcycle Stunt Girl Jumped above Bike Seat Viral Video).
पांढरा टी शर्ट घातलेला एक मुलगा अतिशय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. त्याच्या मागे एक मुलगी बसलेली दिसते. व्हिडिओच्या सुरूवातीला ही बाईक वेगाने चालली आहे इतकेच आपल्याला समजते. पण नंतर या बाईकचा वेग इतका वाढतो की स्पीड ब्रेकरमुळे किंवा अन्य कोणत्या गोष्टीमुळे ही मुलगी अतिशय वेगाने हवेत उडल्याचे दिसते. इतकेच नाही तर ती ज्या वेगाने वर जाते त्याच वेगाने ती पुन्हा बाईकवर येत असल्याचे दिसते. हे पाहताना आपल्या काळजाचा ठोका काही सेकंदांसाठी चुकण्याची शक्यता आहे. कारण ही मुलगी हवेत उडाली आणि ती बसेपर्यंत बाईक पुढे गेली तर काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र तसे न होता ती परफेक्ट पुन्हा बाईकवर आहे त्याचठिकाणी बसल्याचे दिसते. असे व्हिडिओमध्ये २ वेळा होताना दिसते.
ट्विटरवर हा १५ सेकंदांचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून २२ लाखांहून अधिक जणांनी तो आतापर्यंत पाहिला आहे. जवळपास १ लाख जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे तर काहींनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. काहींनी या मुलांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी मुलगी अशाप्रकारे वर जाऊन परफेक्ट वेळेला खाली कशी येते, यामागेचे शास्त्र काय असा प्रश्नही विचारला आहे. हे सगळे पाहायला चांगले वाटत असले तरी अशाप्रकारचे धाडस कोणीही चुकूनही करायला जाऊ नये हे मात्र नक्की.